ग्राहकांकडे 124 कोटींची थकबाकी; महावितरणचे सहकार्याचे आवाहन | पुढारी

ग्राहकांकडे 124 कोटींची थकबाकी; महावितरणचे सहकार्याचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे परिमंडलातील 5 लाख 87 हजार 286 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 124 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे नाइलाजास्तव गेल्या 20 दिवसांमध्ये 18 हजार 952 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येत असल्याने थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच आहे. वीजबिलांच्या वसुलीमधूनच वीज खरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसुलीला वेग आला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी सर्व अधीक्षक अभियंते कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. स्वतः मुख्य अभियंता राजेंद्र पवार परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत.

पुणे शहरात एकूण 2 लाख 54 हजार 911 वीजग्राहकांकडे 46 कोटी 63 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 2 लाख 17 हजार 625 ग्राहकांकडे 32 कोटी 32 लाख रुपये, वाणिज्यिक 34 हजार 869 ग्राहकांकडे 11 कोटी 64 लाख रुपये, औद्योगिक 2 हजार 417 ग्राहकांकडे 2 लाख 67 हजार रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये 9 हजार 726 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 1 लाख 45 हजार 622 वीजग्राहकांकडे 32 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 23 हजार 486 ग्राहकांकडे 19 कोटी 93 लाख रुपये, वाणिज्यिक 18 हजार 491 ग्राहकांकडे 8 कोटी 28 लाख रुपये, औद्योगिक 3 हजार 645 ग्राहकांकडे 3 कोटी 99 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये 4 हजार 539 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण 1 लाख 86 हजार 753 वीजग्राहकांकडे 45 कोटी 94 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 67 हजार 17 ग्राहकांकडे 32 कोटी 87 लाख रुपये, वाणिज्यिक 17 हजार 313 ग्राहकांकडे 8 कोटी 59 लाख रुपये, औद्योगिक 2 हजार 423 ग्राहकांकडे 4 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 4 हजार 687 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा

Back to top button