चेन्नई; वृत्तसंस्था : आयपीएल 2024 स्पर्धेला आज (दि. 22) पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोणत्याही संघासाठी सीएसकेला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नाही. आरसीबीचा संघही 2008 नंतर सीएसकेचा हा बालेकिल्ला भेदू शकलेला नाही. (IPL 2024)
सीएसके आणि आरसीबी यांच्यात चेपॉक स्टेडियमवर 2008 ते 2023 दरम्यान एकूण आठ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये आरसीबीने फक्त एक, तर सीएसकेने सात सामने जिंकले आहेत. आरसीबीने 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात विजय मिळवला होता. त्या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करत 126 धावा केल्या होत्या. या लो स्कोअरिंग मॅचमध्ये सीएसके बाजी मारणार असे वाटत होते, पण धोनीच्या संघाला सामना जिंकण्यासाठी 14 धावा कमी पडल्या. मात्र, त्या विजयानंतर बंगळूर फ्रँचायझीला चेपॉकच्या मैदानावर सीएसकेला पराभूत करण्यात यश आलेले नाही. आयपीएल 2019 च्या मोसमात या मैदानावर शेवटच्या वेळी दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, ज्यामध्ये चेन्नई संघाने 7 विकेटस्ने सामना जिंकला होता.
चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियम हे नेहमी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानले जाते. या मैदानावर फिरकीपटूंना अधिक मदत मिळते. येथील खेळपट्टीवर चेंडू फार धिमी असतो आणि ज्याचा फायदा फिरकीपटूंना फायदा मिळतो. फलंदाजांना खूप सावधपणे खेळावे लागते. जो फलंदाज संयमाने फलंदाजी करतो त्याला मोठी धावसंख्या करण्याची संधी असते. या मैदानावर गेल्या आयपीएलच्या हंगामातील सरासरी धावसंख्या 170 इतकी आहे. जो संघ नाणेफेक जिंकतो तो प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतो. प्रथम गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा हेतू असतो. यामुळे दुसर्या डावात किती धावसंख्या करावी लागेल याचा एक अंदाज येतो. आयपीएलच्या इतिहासात या मैदानावर 4 वेळा 200 हून अधिक धावा झाल्या आहेत. (IPL 2024)
आयपीएलमध्ये सीएसके आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 20 सामने सीएसकेने जिंकले असून 10 सामन्यांत आरसीबीने बाजी मारली आहे, तर एक सामना पावसामुळे वाहून गेला आहे. गेल्या 5 सामन्यांत चेन्नईने चार आणि बंगळूरने फक्त एकच विजय मिळवला आहे.
आरसीबीची सीएसकेविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या 218 तर नीचांकी धावसंख्या 70 आहे. दुसरीकडे सीएसकेची आरसीबीविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या 226 धावा असून नीचांकी धावसंख्या 82 धावा आहे.
चेपॉक मैदानावर विराट कोहलीचेही रेकॉर्ड फारसे चांगले नाही. त्याला येथे खेळल्या गेलेल्या 12 डावांत 30.17 च्या सरासरीने केवळ 362 धावा करता आल्या आहेत. या काळात त्याने केवळ दोनदाच 50+ धावांचा आकडा पार केला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
स्थळ : एम चिदंबरम
स्टेडियम, चेन्नई
वेळ : रात्री 8.00 वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्
लाईव्ह स्ट्रिमिंग : जिओ