Loksabha Election 2024 : राज्यात शंभरीपार 52 हजारांवर मतदार | पुढारी

Loksabha Election 2024 : राज्यात शंभरीपार 52 हजारांवर मतदार

दिलीप शिंदे

ठाणे : गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यातील मतदारसंख्या तब्बल 34 लाख 93 हजार 661 ने वाढली आहे. त्यामध्ये 19 लाख 40 हजार 423 महिला, 15 लाख 47 हजार 86 पुरुष, 1 हजार 848 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शंभर वर्षांवरील 52 हजार 769 मतदार हे लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होतील. (Loksabha Election 2024)

राज्यात महिला मतदारांची संख्या ही पुरुषांपेक्षा 3 लाख 93 हजार 337 ने अधिक नोंदविण्यात आली आहे. 18 ते 19 वयोगटातील 11 लाख 72 हजार 418 नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

34 लाखांनी वाढ

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने राज्यातील 9 कोटी 20 लाख 55 हजार 196 मतदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. 2019 च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत 34 लाख 93 हजार 661 इतकी वाढ झाल्याचे दिसते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदारसंख्या 8 कोटी 85 लाख 61 हजार 535 इतकी होती. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 63 लाख 15 हजार 251, तर महिला मतदार 4 कोटी 22 लाख 46 हजार 878 इतकी संख्या होती, तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2,406 इतकी होती. (Loksabha Election 2024)

18 मार्च 2024 रोजी अद्ययावत मतदारांची एकूण संख्या 9 कोटी 20 लाख 55 हजार 196 इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारसंख्या 4 कोटी 78 लाख 62 हजार 337 इतकी असून, महिला मतदारांची संख्या 4 कोटी 41 लाख 87 हजार 301, तसेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5 हजार 558 इतकी झाली आहे.

हजार पुरुषांमागे 929 महिला

2011 च्या जनगणनेनुसार, 1,000 पुरुषांमागे 929 महिला असे प्रमाण आहे. त्यातुलनेत 2019 साली मतदारयादीतील महिलांचे प्रमाणे 911 इतके होते. महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे 2024 मध्ये या प्रमाणात 923 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. हजारामागे 12 महिला मतदार वाढल्याचे दिसून येते.

दिव्यांग मतदारांची नोंदणी

अद्ययावत मतदारयादीमध्ये 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 13 लाख 13 हजार 623 इतकी आहे. यापैकी 52 हजार 769 मतदार शंभर वर्षांवरील आहेत. याशिवाय 1 लाख 18 हजार 199 इतके मतदार सेनादलातील आहेत. यावर्षी दिव्यांग मतदारांची नोंदणीदेखील मोठ्या संख्येने झाली आहे. मतदारयादीमध्ये एकूण 5 लाख 99 हजार 166 इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित करण्यात आले आहेत.

Back to top button