कृत्रिम पाणवठे वन्यजीवांसाठी ठरताहेत वरदान ! | पुढारी

कृत्रिम पाणवठे वन्यजीवांसाठी ठरताहेत वरदान !

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांसाठी पाण्याची गरज लक्षात घेत सासवड वन विभागाच्या वतीने डोंगर परिसरातील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून टँकरने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठीची होणारी वणवण थांबली असून, हे पाणवठे आता त्यांच्यासाठी वरदान ठरत आहेत. मात्र वाढत्या उष्णतेमुळे टँकरची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. पुरंदर तालुक्यात या वर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगर परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोतांना या वर्षी थोड्याच प्रमाणात पाणी होते, ते देखील आता आटले आहे. त्यामुळे वन्यजीवांचे मोठे हाल सुरू होते.

पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीत शिरू लागले होते. लोकवस्तीत दिवसाही हरणांचे कळप निदर्शनास येत आहेत. तर लांडगे अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. मात्र पुणे- पंढरपूर पालखी महामार्ग व पुणे- मिरज रेल्वे मार्ग ओलांडताना वन्यजीवांना जीव गमावावा लागत आहे. दरम्यान वन्यजीवांची होणारी वणवण थांबवण्यासाठी वन विभागाने कृत्रिम पाणवठ्यांत टँकरने पाणी टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही प्रमाणात वन्यजीवांचे होणारे हाल थांबले आहेत. वाल्हे येथील भवानीमाता मंदिर परिसरातील डोंगरात असलेल्या 6 कृत्रिम पाणवठ्यांत वन विभागाच्या वतीने टँकरने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणवठे आता वन्यजीवांना वरदान ठरत आहेत.

वाल्हेतील भवानीमाता डोंगर परिसरात 6, गुळुंचे व पिंपरे खुर्द येथील प्रत्येकी एक असे एकूण 8 कृत्रिम पाणवठे आहेत. या सर्व पाणवठ्यांत वन विभागातर्फे पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, दिवसेंदिवस दुष्काळाची तीव—ता वाढत आहे. सध्या 15 दिवसांनी टँकर उपलब्ध होत आहे. हे पाणी अपुरे पडत आहे. आठवड्यातून टँकरच्या दोन खेपा होणे आवश्यक आहे. दानशूर व्यक्तींनी सामाजिक बांधिलकीतून टँकर उपलब्ध केल्यास वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत होईल.

– विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड

हेही वाचा

Back to top button