विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा एप्रिलमध्ये; येत्या मंगळवारी होणार शिक्कामोर्तब | पुढारी

विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा एप्रिलमध्ये; येत्या मंगळवारी होणार शिक्कामोर्तब

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पीएच. डी. अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या मंगळवारी पीएच. डी. प्रवेशाबाबत होणार्‍या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रवेशपूर्व परीक्षेच्या विविध विषयांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकार्‍यांनी दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. परंतु, या नियमावलीला विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विरोध होत आहे.

पीएच. डी. रिसर्च सेंटर असणार्‍या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकवल्या जाणार्‍या महाविद्यालयातील प्राध्यापकांनाच यापुढील काळात विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करता येणार आहे. परिणामी, पीएच. डी. मार्गदर्शकांची संख्या कमी होणार आहे. पीएच. डी. मार्गदर्शकांकडे उपलब्ध असलेल्या जागा विचारात घेऊनच विद्यापीठाकडून पीएच. डी. प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. त्यामुळे पुढील काही दिवसांत पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले जातील. परंतु, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी असणार आहे.

विद्यापीठातर्फे पीएच. डी. प्रवेशाबाबत विविध बैठका घेतल्या जात आहेत. त्यातील एका बैठकीत एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 7 एप्रिल रोजी विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पात्रतेसाठी घेतली जाणारी सेट परीक्षा होणार आहे. त्यामुळे पीएच. डी. प्रवेशपूर्व परीक्षा दुसर्‍या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button