धुळे : जिल्ह्यात 95 हजार 948 कुणबी नोंदी आढळल्या | पुढारी

धुळे : जिल्ह्यात 95 हजार 948 कुणबी नोंदी आढळल्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा– धुळे जिल्ह्यात विविध शासकीय विभागातील 1967 पुर्वीच्या 36 लाख 61 हजार 530 नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा 95 हजार 948 नोंदी आढळून आल्या आहेत. अशी  माहिती सहायक नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी दिली आहे.

राज्यातील कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना  वितरीत करण्यासाठी 1967 पुर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी, तपासणी करण्याचे शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरावरील विविध शासकीय विभागातील 1967 पुर्वीच्या 36 लाख 61 हजार 530 नोंदीच्या कागदपत्रांची पडताळणी, तपासणी करण्यात आल्या आहेत. त्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा 95 हजार 948 नोंदी आढळून आल्या आहेत.

धुळे जिल्ह्यात आढळुन आलेल्या कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे सर्व दस्तऐवज स्कॅन करुन या नोंदी जिल्ह्याच्या https://dhule.gov.in/kunbi-documents/  या संकेतस्थळावर तालुकानिहाय, गाव निहाय व विभाग निहाय प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोंदी ज्या व्यक्तींची आहे. त्यांचे कुटूंबातील व रक्तनात्यातील नागरिकांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणेकामी शासनाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील कुणबी,मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र व्यक्तींनी जिल्ह्याच्या वरील संकेतस्थळावर भेट देवून त्यांच्या कुटूंबातील, रक्तनात्यातील व्यक्तींची नोंदी शोधुन त्या व्यक्तींशी (नोंद नमुद असलेल्या ) आपले रक्ताचे नाते सिद्ध करुन (वंशावळ नमूद करुन ) जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर  करुन जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन घ्यावे असे आवाहन  सहायक नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button