

नगर : पुढारी वृत्तसेवा : केडगाव उपनगरातील अर्चना हॉटेल ते कांदा मार्केट रस्त्याचे तीनदा उद्घाटन होऊनही दुरवस्था कायम आहे. या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यासाठी आठ कोटींची निधी मंजूर होऊनही राजकीय श्रेयवादात या रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. अर्चना हॉटेल ते कांदा मार्केट हा केडगाव उपनगरातील प्रमुख रस्ता आहे. कांदा मार्केटकडे जाणार्या वाहनांची संख्याही मोठी आहे. याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु या रस्त्याची अवजड वाहनांमुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. हा रस्ता जागोजागी उखडला असून, मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून एखादे मोठे वाहन गेले की धुळीचे लोट उठत आहेत.
आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाला असूनही दोन वर्ष उलटले तरी या रस्त्याचे भाग्य उजळले नाही. रस्त्याचे आतापर्यंत तीन वेळा भूमिपूजन झाले. परंतु प्रत्यक्ष काम सुरू झालेच नाही. ठेकेदाराने काही दिवसांपूर्वी साईड गटाराचे काम सुरू केले. एका बाजूच्या साईड गटाराचे काम पूर्ण होऊन सहा ते सात महिने उलटले आहेत. त्यानंतर आता दुसर्या बाजूचे साईड गटाराचे काम हाती घेण्यात आले आहे.
अर्चना हॉटेल ते कांदा मार्केट रस्ताकामाचा कार्यारंभ आदेश होऊनही एक वर्ष उलटले. परंतु ठेकेदार संस्थेने एका वर्षात केवळ शंभर ते दीडशे मीटर अंतरावरील साईड गटाराचेच काम पूर्ण केले. त्यामुळे संपूर्ण कामास किती वेळ लागणार, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
अर्चना हॉटेल ते कांदा मार्केट रस्ता पुढे नेप्ती, आदर्शगाव हिवरेबाजारला मिळतो. त्यामुळे या गावातील गावकर्यांची याच रस्त्याने ये-जा सुरू असते. तसेच या रस्त्यावर मंगल कार्यालय, शाळा, महाविद्यालय असल्याने सतत वर्दळ सुरू असते. नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी या रस्त्याचा वापर करत आहेत. परंतु ठेकेदाराच्या संथ गती कामामुळे विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
लिंक रस्त्याचा वापर
अर्चना हॉटेल ते कांदा मार्केट रस्ता बायपासला मिळतो. वाहनचालकांना बायपासला जाण्यासाठी हा रस्ता जवळ आहे. परंतु अनेक वाहनचालक रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रंगोली चौकातून लिंक रस्त्याने बायपास गाठत आहेत.
अर्चना हॉटेल ते कांदा मार्केट रस्त्यासाठी आंदोलने केली म्हणून आमच्यासह काही महिलांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याने संबंधित ठेकेदार कामात चालढकल करत आहेत. एकूणच राजकीय आकसापोटी रस्ता रखडला आहे.
– संग्राम कोतकर, विभागप्रमुख, शिवसेना