Ashok Saraf : अशोक सराफ : चतुरस्र अभिनेता | पुढारी

Ashok Saraf : अशोक सराफ : चतुरस्र अभिनेता

- डॉ. सलील कुलकर्णी, संगीत दिग्दर्शक

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि अफाट लोकप्रियता लाभलेले चतुरस्र अभिनेता म्हणून सुपरिचित असणारे अशोक सराफ ऊर्फ अशोकमामा यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशोकमामांची भेट ही आपल्याला समृद्ध करणारी असते. मराठी चित्रपटाच्या इतिहासातला अत्यंत मोठा चॅप्टर आपल्याला प्रत्यक्ष भेटतो. हिंदी चित्रपटात सर्व नायकांपेक्षा सहज भूमिका करताना जाणवतात, ते आपले अशोकमामा. (Ashok Saraf)

अशोक सराफ हे नाव पहिल्यांदा कधी ऐकलं, असं आठवायला लागलो. मी शाळेत असताना माझ्या आईनं आम्हाला सायकलवरून विजय टॉकीजला ‘गोंधळात गोंधळ’ पाहायला नेलं होतं, तो दिवस आठवला. दोन-चार महिन्यांतून एखादा चित्रपट पाहायला मिळायचा, तेव्हा आधीच्या जाहिरातीसुद्धा डोळे भरून बघितल्या जायच्या. याची गंमत आता एकाच वेळी नेटफ्लिक्सवर पिक्चर, हॉटस्टारवर मॅच आणि प्राईमवर फ्रेंडस् बघणार्‍यांना कळणार नाही. ‘एक डाव भुताचा’मधले अशोक सराफ तर इतके आवडले की, नंतर बरेच दिवस मी ‘बुरूं’ असा आवाज काढून ‘मास्तुरेऽऽ’ असं म्हणत होतो. त्या चित्रपटानंतर डेक्कनवर खाल्लेला साधा डोसा आठवतो. साधा डोसा आणि अर्धं-अर्धं गोल्ड स्पॉट मी आणि माझ्या बहिणीनं खाल्ला. आईनं नेहमीप्रमाणे त्याग करून केवळ इडली खाल्ली. (Ashok Saraf)

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ या दोघांनी धुमाकूळ घातलेला तो काळ. ‘धुमधडाका’ या चित्रपटातील ‘वाख्या वुक्खहू’वाले अशोक सराफ आणि मग ‘बनवाबनवी’ चित्रपटातील ‘हा माझी बायको’पासून ते ‘धनंजय माने इथेच राहतात काय?’ आणि लिंबू कलरच्या साडीपासून ते ‘कुणीतरी येणार येणार गं’पर्यंत सगळं काही तोंडपाठ झालं. अशोकमामांच्या मला सर्वात आवडणार्‍या भूमिकांमधल्या दोन भूमिका म्हणजे ‘कळत नकळत’मधला मामा आणि ‘चौकट राजा’मधला ‘गणा’. हिंदी चित्रपटात सर्व नायकांपेक्षा सहज भूमिका करताना जाणवतात ते आपले अशोकमामा. या महानायकांबरोबर माझे नाव पडद्यावर बघताना झालेला आनंद मला आजही लक्षात आहे. ‘एक उनाड दिवस’मध्ये हुरहूर असते तीच उरी ऐकणारे अशोक सराफ आणि ‘निशाणी डावा अंगठा’मधले मुख्याध्यापक अशा काही चित्रपटांत मला गाणी करता आली, हे किती मोठं माझं भाग्य आहे.

अलीकडच्या काळातील श्रावणमाशी किंवा आनंदाने वेडेपिसे होणे म्हणत आपल्याला वेड लावणारे ‘एक डाव धोबीपछाड’मधील अशोकमामा अजूनही‘पांडू हवालदार’ या चित्रपटातील ऊर्जा घेऊन वावरतात. ते भेटतात तेव्हा शांत, प्रांजळ, मिस्किल, पण मोजके बोलणारे असतात. मध्यंतरी, ‘झी’नं जीवनगौरव साजरा करताना सिद्धार्थ जाधवनं इतका अप्रतिम परफॉर्मन्स केला की, अशोकमामांना गदगदलेलं पाहिलं. आमच्या ‘सारेगमप’मध्ये ते स्वतः आले होते. शूटिंगदरम्यान मला भेटून त्यांनी अभिनंदन केलं, तेव्हा पाय पडलो आणि त्यांना सांगितलं की, तुम्ही भेटलात की, लहानपण भेटते. शाळा, कॉलेज, साधा डोसा, आईची सायकल… हे सगळं पुन्हा मला भेटतं! मराठी चित्रपटांच्या इतिहासातला अत्यंत मोठा चॅप्टर आपल्याला प्रत्यक्ष भेटतो. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याचा आनंद शब्दातीत आहे. त्यांच्या समृद्ध अभिनय कारकिर्दीचा हा सन्मान आहे. अशोक सराफ यांनी मराठीप्रमाणे हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांतही अभिनय करून अभिनयाचे पैलू दाखवले आहेत. त्यांनी केवळ विनोदी भूमिका केल्या नाहीत, तर चरित्र आणि खलनायकाची भूमिका करून आपल्यातील अष्टपैलूत्व सिद्ध केलं आहे. त्यांच्यातील ‘कॉमेडीचं टायमिंग’ अफलातून आहे. संवाद फेक कशी करावी, हे आताच्या अभिनेत्यांनी त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. अशोकमामा म्हणजे अभिनयाचं विद्यापीठच आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळ सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करून महाराष्ट्र सरकारनंत्यांचा यथोचित गौरव केला आहे.

Back to top button