पुणे – सातारा महामार्गावर विचित्र अपघातात चारजण जखमी | पुढारी

पुणे - सातारा महामार्गावर विचित्र अपघातात चारजण जखमी

माणिक पवार

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे – सातारा महामार्गावर रस्त्यावर लोखंडी पत्रा आडवा पडल्याने तीन वाहने थांबली होती. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने या वाहनांना जोरदार धडक दिल्याने विचित्र अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रकच्या धडकेत कार उड्डाणपुलावरुन खाली कोसळली असून घटनेनंतर ट्रकचालक व किल्नर या दोघांनी पलायन केले. ससेवाडी ( ता. हवेली ) येथील हद्दीत पुणे सातारा महामार्गावरील उड्डाणपुलावर शनिवारी ( दि. २७ ) रोजी सकाळी आठ सुमारास ही घटना घडली. समीर सुनील देसाई वय ३६ रा. सुकेची वाडी ( ता. भुदरगड. जि. कोल्हापूर ) असे जखमी असलेल्याचे नाव असून नसरापूर ( ता. भोर ) येथील सिद्धिविनायक रुग्णालयात त्यांना पोलिसांनी हलविले आहे. अपघातात ट्रक क्र एम.एच. १० सी. आर. ९०३६ वरील चालकाने एसटी बस क्र. एम.एच. १० डी.टी. ३२८९, टेम्पो क्र. ए.पी. ३९ व्ही.सी. ८७७४ व कार क्र. १४ के.यू. ७५१० यांना जोरदार धडक दिली.

अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी रात्री एक टेम्पो दुभाजक तोडून खांबाला धडकला होता. या अपघातामुळे दुभाजकाचा पत्रा तूटून रस्त्यावर पडला होता. तो महामार्ग प्रशासन कडून हलविण्यात न आल्याने सातारा बाजूला वाहने जात असताना रस्त्यावर पडलेला पत्रा आल्याने वाहने थांबली होती. पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने कार, एसटी बस यांचा काही भाग चक्काचूर झाला. अपघातस्थळी राजगड पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सोडवली. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची क्रेन अपघातस्थळी वेळेत न आल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी अखेर खाजगी क्रेन लावून या अपघातातील वाहने बाजूला घेण्यात आली. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

नशीब बलवत्तर म्हणून बचावले प्रवाशी

ट्रकच्या धडकेत उड्डाणपुलावरून उंचावरून कार कोसळली. यात कारचा पुढील भाग चक्काचूर झाला असून कारमधील सहा जणांपैकी समीर देसाई हे जखमी झाले. एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुलावरून कोसळली नाही. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून इतर कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.

हेही वाचा :

Back to top button