मराठा आरक्षण : मनोज जरांगेंच्या जन्मभूमीत आनंदोत्‍सव | पुढारी

मराठा आरक्षण : मनोज जरांगेंच्या जन्मभूमीत आनंदोत्‍सव

शिरूर : पुढारी वृत्‍तसेवा मराठा समाजाच्या सर्व मागण्या महाराष्‍ट्र सरकारने मान्य केल्‍याचे मनोज जरांगे पाटील यांनी विराट सभेत सांगितले. त्‍यानंतर महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक गावात आज आनंदोत्‍सव साजरा करण्यात येत आहे. त्‍याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मभूमी मातोरी गावामध्ये अगदी सकाळपासूनच मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

शिरूर कासार तालुक्यातील मौजे मातोरी या गावचे भूमीपुत्र मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून गेल्या पाच महिन्यापासून अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला सुरुवात केली होती. या आंदोलनाला सकल मराठा बांधवानी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रभर सभा आंदोलने केली. यानंतर जरांगे पाटलांनी राज्य सरकार आरक्षण देत नाही म्हणून आपला मोर्चा 20 जानेवारीपासून थेट मुंबईकडे वळवला होता. यामध्ये लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. यामुळे सरकारवर प्रचंड ताण निर्माण झाला होता.

सरकारची कोंडी पाहता शेवटी सरकारला नमते घ्यावे लागले, अखेर 26 जानेवारीचा मुहूर्त साधून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या राज्य सरकारला मान्य कराव्या लागल्या. या मागण्या मान्य केल्याची घोषणा मनोज तरंगे पाटील यांनी जाहीर करतात महाराष्ट्रभरातील गावागावांमध्ये मोठा आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांची जन्मभूमी मौजे मातोरी या गावामध्ये अगदी सकाळपासूनच महिला पुरुषासाठी सर्व मराठा बांधव रस्त्यावर उतरले असून, गुलालाची उधळण करत, प्रचंड घोषणाबाजी करत डीजेच्या तालावर थिरकू लागले आहेत. फटाक्यांची आतिषबाजी, एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत आहे. मातोरी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावात सर्वत्र उत्सव साजरा होताना दिसत आहे.

हेही वाचा : 

Back to top button