ताडोबात पर्यटकांसमोरच वाघाने सफाई कामगाराला उचलून नेलं | पुढारी

ताडोबात पर्यटकांसमोरच वाघाने सफाई कामगाराला उचलून नेलं

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील रामदेगी जवळील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निमढेला प्रवेशद्वारावर काम करत असलेल्या एका ५२ वर्षीय सफाई कामगाराला वाघाने उचलून नेत ठार केल्याची घटना आज गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. रामभाऊ रामचंद्र हनवते असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना पर्यटकांच्या समोरच घडल्याने प्रचंड भीती पसरली आहे.

चिमूर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक ५९ लगत बफर झोन रामदेगी निमढेला पर्यटक गेटवर सकाळच्या सुमारास रोजंदारी सफाई कामगार रामचंद्र हनवते काम करीत होता. कुटीच्या समोर देवबाबरीत दबा धरुन बसलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला करून ठार केले. गेल्या तीन महिन्यातील ही दूसरी घटना आहे. रामदेगी बफर झोन क्षेत्रात सध्या भानुसखिंडी बछड्यासह, मटकासूर, बबली आदी वाघांचे पर्यटकांना नेहमी दर्शन होते. आज सकाळी रामभाऊ यांच्यावर हल्ला करणारा भानुसखिंडीचा बछडा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भानुसखिंडीचे बछडे आक्रमक आहेत. यापूर्वी देखील येथे येणाऱ्या पर्यटकांवर बछडे अनेकदा गुरगुरत आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सदर घटनेची माहिती परिसरात होताच नागरिकांनी घटनस्थळी गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती वन विभाग व  शेगाव पोलिसांना मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण धानकुटे यांनी मृतदेहाची शोधाशोध केली असता काही अंतरावर मृतदेह आढळून आला.

हेही वाचा : 

Back to top button