Crime : धक्कादायक! कॅन्सर बरा होईल म्हणून गंगेत बुडविले, ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू | पुढारी

Crime : धक्कादायक! कॅन्सर बरा होईल म्हणून गंगेत बुडविले, ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरिद्वारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘कॅन्सर बरा होईल’ होईल या अंधश्रद्धेतून ७ वर्षांच्या मुलाला हरिद्वारमधील हर-की-पौरी येथे गंगा नदीत स्नान करण्यासाठी आणले होते. पण मुलाला पाण्यात बुडवल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण पोलीस चौकीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर होते. या प्रकरणी पोलिसांनी मुलाचे आई-वडील यांच्यासह मावशीला ताब्यात घेतले आहे. (Crime)

माहितीनुसार, ब्लड कॅन्सरने ग्रस्त असलेल्या ७ वर्षांच्या मुलाला हरिद्वारमधील हर-की-पौरी येथे गंगा नदीत साधारणपणे १५ मिनिटे वारंवार बुडवण्यात आले होते. मुलाला स्नान घडविण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. त्या मुलाचा ब्लड कॅन्सर बरा होईल या आशेने त्याला गंगेच्या पाण्यात बुडवण्यात आले होते. या प्रकारात  मुलाचा मृत्यू झाला असून त्याचे रवी सैनी असे नाव आहे. पोलीस चौकीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुलाची मावशी सुधा, त्याचे पालक मंत्रोच्चार करत असताना मुलाला पुन्हा पुन्हा पाण्यात बुडवत असल्याचे दिसतात. या प्रकरणात रवीचे आई-वडील यांच्यासह मावशीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुधासह आई-वडील राजकुमार आणि शांती यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे कुटुंब ईशान्य दिल्लीतील सोनिया विहारचे आहे. मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी काही दिवसांपूर्वी त्याला एम्स-दिल्ली येथे नेले होते, जिथे डॉक्टरांनी कुटुंबाला घरी परतण्यास सांगितले. कारण त्याचा कॅन्सर वाढला होता आणि मुलगा जगण्याची कोणतीही आशा नव्हती. डॉक्टरांनी त्याविरुद्ध सल्ला देऊनही, कुटुंब दैवी चमत्काराच्या आशेने हरिद्वारला रवाना झाले.

हरियाणातील कुरुक्षेत्र येथील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सोमवारी (दि.२२) दुपारी २ च्या सुमारास मुलाला नदीत वारंवार बुडवले जात होते. त्याने सांगितले, “मी किंचाळलो, त्यानंतर एका व्यक्तीने मुलाला जबरदस्तीने त्याच्या मावशीच्या हातातून काढून घेतले. आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो जिवंत असण्याची कोणतीच चिन्हे दिसली नाहीत.”

Crime : ही तर अंधश्रद्धा

एसपी (शहर) स्वतंत्र कुमार यांनी सांगितले की,  रवीच्या प्रकृतीच्या स्थितीमुळे कुटुंबाने अंधश्रद्धेचा आधार घेतला. मुलाच्या शवविच्छेदनात त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाला आहे. दरम्यान, आणखी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगा नदीत बुडण्यापूर्वीच मरण पावला होता की थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला होता, याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा 

Back to top button