मराठा मोर्च्याच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज | पुढारी

मराठा मोर्च्याच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज

नगर: पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणासाठी आंतरवली ते मुंबई असा पाच लाख वाहनांसह निघणारा 25 लाख समाज बांधवांचा मोर्चा 22 जानेवारीला नगरमध्ये पोहोचणार आहे. दरम्यान, नगरमध्ये मोर्चाचे जोरदार स्वागत केले जाणार असून, येथूनही सुमारे 50 हजार वाहनांसह तब्बल अडीच लाख बांधव या मोर्चात सहभागी होतील, असा विश्वास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
नगर येथे पत्रकार परिषदेत गोरक्ष दळवी, गजेंद्र दांगट, राम जरांगे, मदन आढाव आदींनी मोर्चाची माहिती दिली.

यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीला आंतरवालीतून निघणार असून, 26 जानेवारीला ते मुंबईत उपोषण सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये या मोर्चाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आहे. हा मोर्चा 21 रोजी नगर जिल्ह्यात (बाराबाभळी मुक्कामी) येणार आहे, तर 22 जानेवारीला नगर शहरातून पुढे जाणार आहे. या दरम्यान, ज्या ज्या गावच्या शिवारातून हा मोर्चा जाईल, त्या त्या गावकर्‍यांनी पुढच्या गावापर्यंत किंवा थेट मोर्चात सहभागी होऊन मराठा समाजाला पाठिंबा द्यावा, या दरम्यान, शक्य असेल त्यांनी पिण्याचे पाणी पुरवावे, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यात मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. यात जेवण, पाणी, वापरायचे पाणी, स्वयंपाक, विजेची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पार्किंग, प्रशासन समन्वय यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून, स्वयंसेवकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच शहरातील दानशुरांनी वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करण्याची तयारी दर्शविली आहे. मराठाच नव्हे तर इतर समाजातूनही आपले योगदान देण्यासाठी अनेक हात पुढे येत असल्याचे गोरक्ष दळवी यांनी आवर्जून सांगितले.

प्रशासनाकडून असहकार..!

मोर्चात महिलांचीही तुकडी आहे. त्यामुळे महिलांच्या सोयीसाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी संपर्क केला, मात्र त्यांनी आम्ही पुरेशी सुविधा पुरवू शकत नाही, अशी भूमिका घेतल्याचे दळवी यांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चा समितीचे आवाहन

  • ओबीसीसह इतर समाजानेही पाठींबा द्यावा
  • अन्नदानासाठी अनेक मदतीचे हात सरसावले पिण्याच्या पाण्यासाठीही दानशुरांनी पुढे यावे
  • पाण्याचे कलेक्शन शहरात ओम गार्डनवर करणार
  • नगरमधून…मोर्चात 50 हजार वाहने नेणार
  • अडीच लाख बांधव मोर्चात येणार
  • स्वयंसेवकांच्या समित्यांची स्थापना
  • नाष्टा-जेवण-पाणी-विजेचे नियोजन

मराठा मोर्चेकरांचे असेही स्वागत

  • बाराबाभळीत मुस्लिम समाज करणार स्वागत
  • माळी समाजाकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर
  • इतर समाजही मोर्चात योगदान देण्यासाठी सज्ज

असे असेल मोर्चाचे स्वरुप

  • ट्रॅक्टरसह इतर 50 हजार वाहनांचा ताफा
  • 25 लाख समाजबांधवांचा असेल सहभाग
  • 50 हजार महिलांची स्वतंत्र तुकडीही मोर्चात

असा दाखल होणार नगरमध्ये मोर्चा

  • 20 जानेवारीः अंतरवली ते मातोरी मुक्कामी
  • 21 जानेवारी : सकाळी नाष्टाः मिडसांगवी चहापान
  • दुपारचे जेवण : तनपुरवाडी
  • रात्री मुक्काम : बाराबाभळी
  • 22 जानेवारी : सकाळी नाष्टा: नगर शहर
  • दुपारी जेवण : सुपा
  • रात्री मुक्काम : रांजणगाव गणपती

हेही वाचा 

Back to top button