आश्वासित प्रगती योजना लागू करणार : मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन | पुढारी

आश्वासित प्रगती योजना लागू करणार : मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रश्नाबाबत शासनाचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आहे. आश्वासित प्रगती योजना अर्थमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने लागू करणार आहे. शिक्षकेतरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या महामंडळाचे 51 वे राज्यव्यापी अधिवेशन नुकतेच सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे पार पडले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार निरंजन डावखरे, कोकण विभागातील राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे-परब, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विशाल परब आदींच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार काळे यांनी अध्यक्षीय भाषणात 2021 चा आकृतिबंध पॅटर्न येऊनही भरती का बंद आहे, हे शासनाने सांगावे, असा प्रश्न उपस्थित केला.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मिळणार्‍या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ येत्या जानेवारीअखेर मिळवून देण्याबाबत तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही शासनदरबारी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी महामंडळाने केलेल्या कामाचा आढावा घेतला. या प्रसंगी डोर्लेवाडी येथील ज्ञानदेव बाबूराव म्हस्के यांना गौरविण्यात आले.
अध्यक्ष अनिल माने, मोरेश्वर वासेकर, रवींद्र गवळी, सरिता कुलकर्णी, प्रिया पवार, देविदास पांडागळे, गोवर्धन पांडुळे, खैरुद्दीन सय्यद यांच्यासह बारामतीचे अध्यक्ष विश्वास तांबे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button