Goa News | बंगळूरच्या CEO ने गोव्यात केली मुलाची हत्या, मृतदेह बॅगेत घेऊन गेली… | पुढारी

Goa News | बंगळूरच्या CEO ने गोव्यात केली मुलाची हत्या, मृतदेह बॅगेत घेऊन गेली...

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : सिकेरी-कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये स्वत:च्या चार वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह बॅगेत भरून पसार झालेल्या महिलेला कर्नाटकातील चित्रदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे. (Goa News)

ती महिला स्वत:च्या चार वर्षीय मुलासह सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये उतरली होती. जाताना ती एक बॅग घेऊन एकटीच टॅक्सीने पसार झाली होती. हॉटेलचा रूम सोडल्यानंतर रूम-बॉय जेव्हा खोलीत गेला तेव्हा त्याला खोलीत रक्त पाहून काहीतरी वेगळे घडल्याचे समजले. हॉटेल व्यवस्थापनास याची माहिती दिल्यानंतर कळंगुट पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. (Goa News)

कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासकामास सुरुवात केली आणि त्या महिलेला घेऊन गेलेल्या टॅक्सीचालकाचा शोध लावला असता ती महिला चित्रदुर्ग येथे गेल्याचे समजले. कळंगुट पोलिसांनी यासंदर्भातील माहिती चित्रदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर चित्रदुर्ग पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. कळंगुट पोलिस तिला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

गोव्यातून मुलाचा मृतदेह बॅगेत ठेवून कर्नाटकात नेला

सदर महिला ही बंगळूर येथील ३९ वर्षीय स्टार्टअपची संस्थापक आणि सीईओ आहे. तिच्यावर चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत ठेवून कर्नाटकला परत जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली होती.

मुलाची हत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोमवारी सकाळी सूचना सेठ ज्या अपार्टमेंटमधून बाहेर पडली होती त्या अपार्टमेंटची साफसफाई करताना हाऊसकीपिंग कर्मचार्‍याला रक्ताचे डाग आढळून आले होते. गोवा पोलिसांनी दिलेल्या अलर्टच्या आधारे, तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील आयमंगला पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले.

तिला ताब्यात घेण्यासाठी आणि ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यासाठी कळंगूट येथून पोलिसांचे एक पथक सोमवारी उशिरा कर्नाटकला रवाना झाले. कळंगूट पोलिस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांनी द टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, शनिवारी कांदोळी येथील हॉटेलात सूचनाने बंगळूरचा पत्ता दिला होता. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा तिला बंगळूरला परत जाण्यासाठी टॅक्सी हवी होती, तेव्हा तिला विमान प्रवास स्वस्त आणि अधिक सोयीचा असल्याचा सल्ला देण्यात आला होता. पण तिने रस्त्याने प्रवास करण्याचा आग्रह धरला. तेव्हा तिला हॉटेलकडून टॅक्सीची व्यवस्था करण्यात आली.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ च्या सुमारास रक्ताच्या डाग आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक हॉटेलमध्ये पोहोचले आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात सूचना सर्व्हिस अपार्टमेंटमधून एकटीच बाहेर पडताना दिसून आली. तिच्यासोबत तिचा मुलगा दिसला नाही.

पोलीस निरीक्षक नाईक यांनी पुढे सांगितले की, त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला आणि सूचनाला फोन देण्यास सांगितले. तिच्याकडे तिच्या मुलाबद्दल विचारणा केली असता, सूचनाने त्याला फातोर्डा येथे मित्राच्या घरी सोडल्याचा दावा केला. तिने घराचा पत्ता पाठवून दिला. पण तो फेक निघाला.

त्यानंतर नाईक यांनी टॅक्सी ड्रायव्हरला पुन्हा फोन केला. त्यावेळी तो त्यांच्याशी कोकणीमध्ये बोलला आणि त्याला जवळच्या पोलीस स्थानकात जाण्यास सांगितले. तोपर्यंत टॅक्सी चित्रदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली होती.

ड्रायव्हरने सूचनाला याची कसलीही माहिती न देता टॅक्सी थेट आयमंगला पोलिस स्थानकात नेली. तेथील एका अधिकाऱ्याने गाडीची तपासणी केली असता एका पिशवीत मुलाचा मृतदेह आढळल्याने पोलीस निरीक्षक नाईक यांचा संशय खरा ठरला.

हेही वाचा : 

Back to top button