Damini squad : साक्री उपविभागात नव्याने दामिनी पथकाची स्थापना | पुढारी

Damini squad : साक्री उपविभागात नव्याने दामिनी पथकाची स्थापना

पिंपळनेर:(जि.धुळे)पुढारी वृत्तसेवा-जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण साजन सोनवणे यांच्या नेतृत्वात साक्री पोलिस उपविभाग कार्यक्षेत्रात साक्री शहरासह पिंपळनेर, निजामपूर, सोनगीर व धुळे तालुका यासाठी स्वतंत्र दामिनी पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली. पथकाच्या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

साक्री उपविभागातील मुला-मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, पोलिस काका तसेच पोलिस दीदी या उपक्रमांतर्गत शाळा-महाविद्यालयामधील मुला-मुलींमध्ये जनजागृती व्हावी तसेच त्यांच्यासाठी असलेल्या पॉक्सो कायदा, स्वतःचे रक्षण कसे करावे याबाबत हे पथक मार्गदर्शन करणार आहे. तसेच डायल 112 व प्रसारमाध्यमांचा वापर कसा करावा, त्यामुळे काय परिणाम होतात, शाळेत जाणाऱ्या मुला मुलींसाठी रस्त्याने छेड काढणाऱ्या मुलांवर कारवाई करणे, सोनसाखळी चोर यांच्यावर कारवाई करणे तसेच महिलांवरील अन्याय, त्याचे गुन्हे, हरवलेल्या महिलांचा शोध घेणे, कौटुंबिक हिंसाचाराबाबत जनजागृती करणे याबाबत दामिनी पथक मार्गदर्शन करेल. बसस्थानक, गर्दीची ठिकाणे, शाळा-महाविद्यालय परिसरात गस्त घालण्यात येणार असून, पथकात महिला पोलिस ईला गावित, रोहिणी सूर्यवंशी, प्रियंका मोरे काम पाहतील.

महिला व मुलींच्या अनुषंगाने दामिनी पथकाचा जास्तीत जास्त उपयोग करून व महिलांना कोणतीही समस्या असल्यास दामिनी पथकाशी संपर्क करावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांनी केले आहे. दरम्यान या दामिनी पथकाच्या स्थापना व वाहन प्रारंभप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक संजय सूर्यवंशी, उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button