Lok Sabha Election 2024 : दिल्लीत बोलणी अन् महाराष्ट्रात काँग्रेसकडून स्वबळाची तयारी
मुंबई : गौरीशंकर घाळे : राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची नियुक्ती केल्यानंतर आता काँग्रेसने प्रत्येक जागेवरील इच्छुक उमेदवारांची नावे मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी दिल्लीत बैठकांचा घाट घातलेला असतानाच राज्यातील ४८ जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
जागावाटप आणि वंचित बहुजन आघाडीचा समावेश, या दोन मुद्द्यांवर सध्या महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देण्याची चढाओढ लागली आहे. या वादंगाच्या पार्श्वभूमीवरच मंगळवारपासून राजधानी दिल्लीत जागावाटपाच्या वाटाघाटींना सुरुवात होत आहे. त्यासाठी कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आदी नेते उपस्थित राहणार आहेत. एकीकडे जागावाटपासाठी वाटाघार्टीचे सत्र सुरू झाले असतानाच काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर स्वबळाचीही चाचपणी चालविली आहे. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर लोकसभा निवडणूक समन्वयकांची नियुक्ती केली. त्यानंतर आता प्रत्येक जागेवरील इच्छुक आणि सक्षम उमेदवारांच्या नावांचीही चाचपणी केली जात आहे.
ठाकरे गटाची २३ जागांची मागणी
शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेसाठी २३ जागांची मागणी केली आहे. मागच्या निवडणुकीत आमचे १८ खासदार निवडून आले होते, असे सांगत संजय राऊत यांनी काँग्रेसला फटकारलेही होते. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला प्रत्येकी बारा जागांचा फॉर्म्युलाही दिला होता. काँग्रेसने आघाडी आणि जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा शिवसेनेसोबत निम्म्या निम्म्या जागा लढण्याचा आमचा निर्णय आधीच झाल्याचा गौप्यस्फोट अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेसनेही सावध भूमिका घेत तयारीला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने महाविकास आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
हेही वाचा :