वंदे भारत उद्घाटन पत्रिकेतून खा. जलील यांचे नाव वगळले; एमआयएम अक्रमक | पुढारी

वंदे भारत उद्घाटन पत्रिकेतून खा. जलील यांचे नाव वगळले; एमआयएम अक्रमक

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे आणि विमान सेवेत वाढ व्हावी, यासाठी मराठवाड्यातून आपणच सतत संसदेच्या अधिवेशनात आवाज उठविला आहे. असे असतानाही वंदे भारत रेल्वेच्या निमंत्रण पत्रिकेतून आपले नाव वगळण्यामागचे कारण काय? असा सवाल उपस्थित करीत एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला. त्यासोबतच या प्रकाराला एमआयएम स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी आज शुक्रवारी (दि.२९) पत्रकार परिषदेतून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना दिला. भारतीय जनता पार्टीकडून विकास कामांमध्येही सतत घाणेरडे राजकारण केले जात आहे. यापूर्वीही विविध विकास कामांच्या उद्घाटन पत्रिकेतून आपले नाव वगळण्यात आल्याचे खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढे बोलताना खा. जलील म्हणाले, जालना ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आॉनलाईन उद्घाटन होणार आहे. जालनातून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तर छत्रपती संभाजीनगरमधून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. ही रेल्वे परभणीतून जाणार नसतानाही कार्यक्रमाच्या नियमंत्रण पत्रिकेत तेथील खासदार संजय जाधव यांचे नाव टाकण्यात आले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदारांची नावे टाकली जातात. परंतु, जिल्ह्याच्या खासदाराचे नाव वगळले जाते. असे का? असा सवालही खा. जलील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. नेमके कोणाच्या सांगण्यावरून आपले नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळले, याचे उत्तर आता खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच द्यावे, असेही खा. जलील यावेळी म्हणाले.

दरम्यान, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांमधून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधुन वंदे भारत रेल्वेला आम्ही धावू देणार नाही, असा इशाराही एमआयएमचे जिल्हा व शहराध्यक्षांनी दिला आहे. यापूर्वी देखील अनेक विकास कामांच्या उद्घाटन पत्रिकेत खा. जलील यांच्या नावाला कात्री लावण्यात आली होती.

डॉ. कराड यांचे नावही वगळले

आपण विरोधी पक्षाचे खासदार असल्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपले नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळले असावे. परंतु, शहरातील राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांचे नाव टाकले जाते. अन् केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे नाव वगळले जाते. यामागेही काही ना काही कारण असेलच, असेही खा. जलील म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button