लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात तीन कोटींचे घबाड

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात तीन कोटींचे घबाड

छत्रपती संभाजीनगर : लाचखोरीच्या प्रकरणात फरार झालेला पोलिस निरीक्षक हरिभाऊ नारायण खाडे याच्या घरझडतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) तब्बल तीन कोटी रुपयांचा ऐवज सापडला. तसेच घरे आणि गाळ्यांची कागदपत्रेही हाती लागली आहेत. यात तब्बल एक कोटी 8 लाख 76 हजार 528 रुपयांची रोकड, 370 ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि दागिने, साडेपाच किलो चांदीचा समावेश आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने जिजाऊ मल्टिस्टेटच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात एका बिल्डरकडून एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. ही लाच कौशल प्रवीण जैन या व्यापार्‍यामार्फत देण्यात येणार होती. बिल्डरने 'एसीबी'कडे याची तक्रार केल्यानंतर 'एसीबी'ने सापळा रचून पाच लाख रुपये स्वीकारताना कौशल जैनला पकडले. ही कारवाई झाल्याचे लक्षात येताच पोलिस निरीक्षक खाडे आणि या प्रकरणात त्याला मदत करणारा हवालदार आर. बी. जाधवर फरार झाला. खाडे ज्या भाड्याच्या घरात बीडमध्ये राहत होता, त्याला 'एसीबी'ने सील लावले होते. या घराच्या झडतीची परवानगी 'एसीबी'ने बीडच्या विशेष न्यायालयाकडून गुरुवारी घेतली आणि ती मिळताच घराचे सील तोडून झडती घेतली.

घरातील ऐवज

खाडे याच्या चाणक्यपुरी (बीड) येथील घरात 'एसीबी'ला रोख रक्कम, सोन्याचे 72 लाख रुपये किमतीचे दागिने, 4 लाख 62 हजार रुपयांची चांदी, बारामती आणि इंदापूरमधील फ्लॅटची तसेच इंदापूरच्या व्यापारी गाळ्याची, बारामती आणि परळीतील प्लॉटची कागदपत्रे सापडली. घरझडतीची ही कारवाई 'एसीबी'चे पोलिस उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलिस निरीक्षक युनूस शेख, अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी, अनुमंत गोरे, अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे, संतोष राठोड आणि सुदर्शन निकाळजे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news