नगर जिल्ह्यात 1217 गावांची खरीप पिके मातीमोल | पुढारी

नगर जिल्ह्यात 1217 गावांची खरीप पिके मातीमोल

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 585 खरीप हंगामी गावांपैकी 549 गावांतील पिकांची अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी, तर 36 गावांची पैसेवारी 50 पेक्षा अधिक आली आहे. 668 रब्बी गावांतील खरीप पिकांची पैसेवारीदेखील 50 पेक्षा कमी आली. राज्य शासनाने यापूर्वीच जिल्ह्यातील 96 महसूल मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेली आहे. अंतिम पैसेवारी अहवालाने शासनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. एकंदरीत जिल्ह्यातील 1 हजार 217 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 606 महसुली गावे असून, त्यापैकी 585 गावे खरीप हंगामासाठी, तर उर्वरित 1 हजार 21 गावे रब्बी हंगामासाठी निश्चित केली आहेत.

खरीप हंगामात संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यांतील सर्वच गावांचा समावेश आहे. याशिवाय कोपरगाव तालुक्यातील 16, राहाता तालुक्यातील 24, राहुरी तालुक्यातील 17, नगर 5, नेवासा 13, पाथर्डी तालुक्यातील सर्व 80, शेवगाव 34 व पारनेर तालुक्यातील 31 गावे देखील खरीप हंगामात समाविष्ट आहेत. 15 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. 585 गावांपैकी तब्बल 549 गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील 93 टक्के गावांतील खरीप पिके पावसाअभावी वाया गेल्याचे पुढे आले आहे. पारनेर तालुक्यातील 31 आणि नगर तालुक्यातील पाच अशा 36 गावांत खरीप पिके चांगली असल्याचे पैसेवारीवरून सिद्ध झाले आहे.

50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली जाते. या गावांना विविध सवलती उपलब्ध केल्या जात आहेत. मात्र, राज्य शासनाने 10 नोव्हेंबर 2023 रोजीच पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव वगळता सर्वच 96 महसूल मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेली आहे. अंतिम पैसेवारी अहवालाने या दुष्काळसदृश परिस्थितीवर शिक्कामोर्तबच केले आहे.

अधिक पैसेवारी असलेली 36 गावे
नगर तालुक्यातील खोसपुरी, पांगरमल, मजले चिंचोली, आव्हाडवाडी व उदरमल ही पाच गावे तसेच पारनेर तालुक्यातील गारखिंडी, पाडळी आळे, कळस, दरोडी, पळशी, मांडवे खुर्द, देसवडे, खडकवाडी, वडगाव सावताळ, गाजदीपूर, वनकुटे, तास, पोखरी, वारणवाडी, टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, कर्जुले हर्या, कासारे, सावरगाव, काताळवेढा, म्हसोबाझाप, नांदूरपठार, डोंगरवाडी, पळसपूर, धोत्रे बुद्रुक, ढोकी, कारेगाव, तिखोल, ढवळपुरी, भनगडेवाडी या 31 गावांचा समावेश आहे.

रब्बीतील 668 गावांत कमी पैसेवारी
रब्बी गावांत 2/3 किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असल्यास त्या रब्बी गावांची खरीप हंगामी पिकांची अंतिम पैसेवारी घेतली जाते. त्यानुसार 1 हजार 21 रब्बी गावांपैकी 668 गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी आली आहे. यामध्ये नेवासा तालुक्यातील 114, राहुरी 79, कर्जत 118, जामखेड 87, पाथर्डी 57, शेवगाव 79, कोपरगाव 63 गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 353 रब्बी गावांची पैसेवारी मात्र 50 पेक्षा अधिक आली आहे. यामध्ये नगर तालुक्यातील 116, पारनेर तालुक्यातील 100 तर श्रीगोंदा तालुक्यातील 115 व श्रीरामपूर तालुक्यातील 22 गावांचा समावेश आहे.

Back to top button