पीएमपीची आर्थिक धाव अपुरीच ! बूस्टरची गरज | पुढारी

पीएमपीची आर्थिक धाव अपुरीच ! बूस्टरची गरज

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपी प्रशासनाने गेल्या महिन्यात 30 दिवसांपैकी 19 वेळा दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले आहे. यामुळे पीएमपीच्या उत्पन्नाला हातभार मिळाला आहे. मात्र, दररोज 2 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले तरच पीएमपीचा कोलमडलेला आर्थिक गाडा सावरणार आहे. पीएमपी प्रशासनाला वर्षाला, महिन्याला आणि दिवसाला मिळणारे उत्पन्न हे पीएमपीचा आर्थिक गाडा चालविण्यासाठी अपुरे आहे. आर्थिक गाडा चालविण्यासाठी पीएमपी प्रशासनाला दरवर्षी दोन्ही महापालिकांकडून संचलन तूट घ्यावी लागत आहे. आता पीएमआरडीए भागात सेवा पुरवावी लागत असल्याने त्यांच्याकडूनही संचलन तूट घ्यावी लागत आहे. पीएमपीच्या या संचलन तुटीमध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. ही तूट कमी होण्याऐवजी दरवर्षी त्यात वाढ होत आहे. त्यामुळे पीएमपीच्या दिवसाच्या उत्पन्नातही वाढ होणे, गरजेचे असल्याचे समोर आले आहे.

महिन्यात 1363 बस ब्रेकडाऊन
पीएमपी प्रशासनाच्या ताफ्यात 2080 बसगाड्या आहेत. त्यातील 1600 च्या घरात दररोज बस मार्गावर असतात. पुणेकरांची लोकसंख्या पाहता, दररोज किमान साडे-तीन हजार बस मार्गावर असणे आवश्यक आहे. मात्र, या गाड्यांचे ब्रेकडाऊनचे प्रमाण देखील वाढते आहे. नोव्हेंबर 2023 या महिन्यात 1363 गाड्या रस्त्यातच बंद पडल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. यातील ठेकेदारांच्या 776 तर पीएमपी स्वमालकीच्या 587 बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत. पुणेकरांना जर चांगली सेवा द्यायची असेल तर याचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.

20 तारखेला मिळाले 2 कोटी उत्पन्न…
पीएमपी प्रशासनाला नोव्हेंबर महिन्यातील 20 तारखेला 2 कोटी 6 लाख 31 हजार 945 हजार रुपये उत्पन्न मिळाले. असेच उत्पन्न पीएमपीला दररोज मिळायला हवे. असे उत्पन्न मिळाल्यास पीएमपीचा गाडा व्यवस्थित चालणार आहे. मात्र, याकरिता पुणेकर प्रवाशांना प्रशासनाने आपली सेवा वापरण्यासाठी आकर्षित करायला हवे.

पीएमपी गाड्यांची नोव्हेंबर महिन्याची स्थिती…
मार्गावरील बस महिना 50,541 दिवस 1685
प्रवासी संख्या महिना 3 कोटी 38 लाख 3 हजार 886 दिवस 11 लाख 26 हजार 796
मार्गावरील फेर्‍या महिना 5 लाख 51 हजार 949 दिवस 18 हजार 398
उत्पन्न महिना 47 कोटी 40 लाख 10 हजार 016 दिवस सरासरी 1 कोटी 58 लाख 334

Back to top button