‘त्रिपुरारी’वर जलाभिषेक ; जोरदार पावसाने दाणादाण | पुढारी

‘त्रिपुरारी’वर जलाभिषेक ; जोरदार पावसाने दाणादाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मंदिरांत रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची आरास सुरू असतानाच सायंकाळी 7.30 वाजता जोरदार पावसाने दाणादाण उडवून दिली. पावसाने सर्वच रस्त्यांना पूर आला होता. दरम्यान, दीड मिलीमीटर पावसाची नोंद रात्री नऊपर्यंत झाली होती. आजच्या पावसाने उकाडा कमी होऊन गारठा जाणवू लागला. शहरात दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी 23 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्या दिवशी झालेला यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा अवकाळी पाऊस ठरला. नंतर मात्र शहरात पाऊस झाला नाही. रविवारी थेट त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी आभाळ ढगांनी दाटून आले. शिवाजीनगर 2.8, चिंचवड 1, लव्हळे 1.5, मगरपट्टा 2, पाषाण 3.5 मिलीमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे.

त्रिपुरारीची तयारी अन् पावसामुळे तारांबळ
सायंकाळी सातच्या सुमारास आंधार पडताच सर्वंच मंदिरांत तुळशी विवाह अन् त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्साह होता. अनेक भागांत दिव्यांची आरास करण्याची तयारी सुरू असतानाच सायंकाळी 7.20 वाजता आकाशात चंद्र दिसताच पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर, दगडूशेठ गणपती परिसर, तुळशीबाग, कर्वे रस्ता, लक्ष्मी रस्ता या भागांसह शहरातील सर्व पेठा, उपनरांतील बहुतांश भागांत पावसाने दाणादाण उडवून दिली.

वाहतूक कोंडी, बचावासाठी धावपळ
रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांची मात्र धावपळ झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक सखल भागांतील पुलावर पाणी साचले होते. सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, दांडेकर पूल, बाजीराव रस्ता या भागांत पावसामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.

अचानक सरींमुळे वातावरणात गारठा
शहरात रविवारी उकाडा जाणवत होता. किमान तापमान सायंकाळी 7.30 पर्यंत 18 ते 22 अंशांवर होते. मात्र, पावसाने हजेरी लावताच तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली अन् गारवा जाणवू लागला.

हेही वाचा : 

Back to top button