Nashik News : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सुटले पाणी, गोदाघाट पाण्याखाली | पुढारी

Nashik News : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सुटले पाणी, गोदाघाट पाण्याखाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गंगापूर धरण समूहामधून रविवारी (दि. २६) जायकवाडीसाठी पाणी साेडण्यात आले. धरणातील विसर्गामुळे गोदाघाट पाण्याखाली गेला असून, काठावरील जनजीवन विस्कळीत झाले. तसेच दारणाच्या विसर्गात ५,६९६ क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वरमार्गे ३,२२८ क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे.

मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नाशिकच्या धरणांतून ३.१४३ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात दारणातून विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर गंगापूरसह कडवा आणि मुकणे धरणामधूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सकाळी ५०० क्यूसेक वेगाने गोदापात्रात पाणी साेडण्यात आले. टप्प्यटप्प्याने त्यात वाढ करत दुपारी २ ला हा विसर्ग ४,७२६ क्यूसेकपर्यंत नेण्यात आला. त्यामुळे पंचवटीमधील रामकुंड परिसरासह गोदाघाट पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रावरील छोटे-मोठ्या सांडव्यांवरून पाणी वाहत असल्याने त्यातून मार्गक्रमण करण्याची वेळ नागरिकांवर ओढावली. दरम्यान, सायंकाळी ५ वाजता हा विसर्ग २,६१३ क्यूसेकपर्यंत घटविण्यात आला.

दारणा धरणामधून दोन दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. सध्या ५,६९६ क्यूसेक वेगाने पाणी दारणा पात्रात झेपावते आहे. त्यामुळे दारणा काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कडवामधून १,६२४ तसेच मुकणेमधून १,१०० क्यूसेक वेगाने मराठवाड्याला पाणी दिले जात आहे. दरम्यान, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व नगरमधून एकुण ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये नाशिकच्या धरणातून ३.१४३ टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यानुसार दारणा व गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. साधरणत: आठवडाभर हे आवर्तन कायम राहील, असा अंदाज आहे.

नदीकाठी वीज खंडित

गंगापूर व दारणा धरण समूहातून जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्याची चोरी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार वहन मार्गातील प्रमुख ठिकाणी बंदोबस्त तैनात केला गेला आहे. तसेच अवैध उपसा रोखण्यासाठी काठावरील गावांचा वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला.

धरणांमधील विसर्ग

गंगापूर : २,६१३ क्यूसेक

दारणा : ५,६९६ क्यूसेक

कडवा : १,६२४ क्यूसेक

मुकणे : १,१०० क्यूसेक

नांदूरमध्यमेश्वर : ३,२२८ क्यूसेक

हेही वाचा :

Back to top button