Rajasthan Assembly Elections 2023 : राजस्थानात भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत; विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान सुरू | पुढारी

Rajasthan Assembly Elections 2023 : राजस्थानात भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत; विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थान विधानसभेसाठी आज (दि.२५) सकाळी मतदानाला सुरूवात झाली. राजस्थानात २०० पैकी १९९ जागांसाठी १८७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजस्थानातील ५.५२ कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सध्या राजस्थानात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्ता असून, काँग्रेस नेते अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान येथे काँग्रेस भाजप या दोन पक्षात थेट निवडणुक होणार असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. (Rajasthan Assembly Elections 2023)

निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल असल्याचे मानले जाते. विविध राजकीय पक्षांसाठी या निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीमच ठरणार आहे. यापूर्वी मिझोरम, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश येथील विधानसभा २०२३ ची निवडणुक मतदान प्रक्रीया पूर्ण झाली आहे. आज (दि.२५) राजस्थान विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. तर तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुक मतदान होणार आहे. या सर्व राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. (Rajasthan Assembly Elections 2023)

Rajasthan Assembly Elections 2023: परंपरा कायम की…पुन्हा काँग्रेसच ?

राजस्थानमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत फक्त काँग्रेस विरुद्ध भाजप असेच चित्र पाहायला मिळणार आहे. याशिवाय काही जागांवर बसपा आणि इतर पक्षांचा प्रभाव दिसून येतो. राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा आहेत. तिथे सध्या काँग्रेसचे सरकार असून अशोक गेहलोत मुख्यमंत्री आहेत. कोणताही पक्ष सलग दोनदा सत्तेवर येत नाही, ही राजस्थानची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहते की काँग्रेस पुन्हा सरकार बनवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राजस्थानात क्राईम रेकॉर्डवरील ३२६ उमेदवार रिंगणात

राजस्थानातील विधानसभेच्या २०० जागांसाठी १८७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. गेल्या पाच वर्षांत या राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांसह कोट्यधीश उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोट्यधीश उमेदवारांचे प्रमाण ३५ टक्के असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या उमेदवारांची टक्केवारी १७ टक्के आहे. तरुणांच्या तुलनेत बहुतांश राजकीय पक्षांनी ४० वर्षांपुढील ज्येष्ठ उमेदवारांना तिकीट देताना प्राधान्य दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button