Rajasthan Assembly Elections : राजस्थानात भाजपचा मोठा निर्णय! सात खासदारांना दिली विधानसभेची उमेदवारी

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rajasthan Assembly Elections : राजस्थानमधील 200 विधानसभा जागांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने 41 उमेदवारांना तिकीट दिले असून त्यात सात विद्यमान खासदारांनाही उमेदवारी दिली आहे. यात राज्यवर्धन राठौर, दिया कुमार, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, बाबा बालकनाथ, देवी सिंह पटेल हे सात खासदार विधानसभेभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पहायला मिळणार आहेत.

मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेले राज्यवर्धन सिंह राठोड यांना झोटवाडा येथून तिकीट देण्यात आले आहे. विद्यानगरमधून दिया कुमारी यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. बाबा बालकनाथ तिजारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर हंसराज मीना यांना सपोतरा ​​आणि किरोडी लाल मीना यांना सवाई माधोपूरमधून तिकीट देण्यात आले आहे.

पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर (Rajasthan Assembly Elections)

पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम आज (दि.९) जाहीर करण्‍यात आला. छत्तीसगडमध्ये दोन टप्‍प्‍यात म्‍हणजे ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मिझोराममध्‍ये ७ नोव्‍हेंबर, मध्य प्रदेशमध्‍ये 17 नोव्हेंबर, राजस्थानमध्‍ये २३ नोव्‍हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणा राज्‍यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पाच राज्‍यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे. पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुका २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या रंगीत तालीम मानली जात आहे.

राजस्‍थानमध्‍ये काँग्रेससमोर परंपरा बदलाचे आव्‍हान (Rajasthan Assembly Elections)

२०१८ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ९९ तर भाजपला ७७ जागा मिळाल्या होत्या. ६ जागा बसपा आणि २० जागांवर इतरांनी बाजी मारली होती. सध्या (पोटनिवडणुकीतील निकालानंतर) विधानसभेत काँग्रेसकडे १०८, भाजपकडे ७० आणि इतर २१ आमदार आहेत. राज्यात दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा कायम राहिली आहे. यंदा ही परंपरा बदलाचे आव्‍हान राजस्‍थान काँग्रेससमोर असणार आहे.

गहलोत-पायलट अंतर्गत कलह

मागील पाच वर्षात राजस्थानमधील राजकारणाने अनेक रंग दाखवले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत कलह, सचिन पायलट यांचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्धचे बंड हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले. काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींनी काढलेल्‍या समजुतीमुळे सचिन पायलट यांनी बंडाची भाषा आता बदलली आहे. त्‍यांचे गहलोत यांच्‍याबरोबर पुन्‍हा सूर जुळले आहेत. त्‍यामुळे राजस्‍थान काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद हे भाजपसाठी फायदेशीर ठरतील, याला छेद बसला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयामुळे काँग्रेस राजस्‍थान विधानसभा निवडणुकीत नव्‍या जोमाने उतरणार आहे. पुनरागमनास सज्‍ज असणार्‍या भाजपचे मोठे आव्‍हान काँग्रेस समोर असणार आहे.

सध्या राजस्‍थानमधील सत्ताधारी काँग्रेससमोर बेरोजगारी, गुन्हेगारी यांसारख्या मोठ्या समस्या आहेत. यावर विरोधक सातत्याने आवाज उठवत आहे. निवडणुकीच्या काही महिने आधी आरोग्य हक्क विधेयक मंजूर करून राज्‍य सरकारने या विधेयकाला ऐतिहासिक म्‍हटले आहे. राज्य सरकारने १० लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देणारी चिरंजीवी योजना यापूर्वीच लागू केली आहे. राज्‍य सरकारच्‍या आरोग्‍य योजनांना प्रतिसाद सकारात्‍मक आहे. काँग्रेस आणि भाजप बूथ स्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आम आदमी पक्ष राज्याच्या विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आपचे राष्ट्रीय समन्‍वयक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सातत्याने राजस्‍थानचे दौरे करत आहेत. त्‍यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्‍यंत चुरशीची होणार, असे संकेत मिळत आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news