Rajasthan Assembly Elections : ध्रुवीकरण, तुष्टीकरणाचा फंडा कायम | पुढारी

Rajasthan Assembly Elections : ध्रुवीकरण, तुष्टीकरणाचा फंडा कायम

दीपक टांटिया

मतदारांचे ध्रुवीकरण आणि त्यांचे तुष्टीकरण हा अलीकडच्या काळातला निवडणुकीतला फंडा बनला आहे. आणखी पाच दिवसांनी मतदान होणारे राजस्थान राज्यही त्याला अपवाद नाही. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशा आरोप-प्रत्यारोपांच्या फेर्‍या वाढत चालल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिसवा सरमा यांनी जाहीरपणे ‘होय मी हिंदूंचे राजकरण करतो’ असे म्हटल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आपल्या वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी सरमा अशा प्रकारची वक्तव्ये करीत असल्याचा टोला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मारला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणी, आरोग्य, बेकारी, महागाई अशा प्रकारचे स्थानिक मुद्दे बाजूला पडत चालले आहेत.

भाजपकडून मुस्लिम उमेदवार नाही

राजस्थानमधील एकाही जागेवर भाजपने मुस्लिम व्यक्तीस तिकीट दिलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि हिंदुत्वाच्या विषयावर भाजप निवडणुकीला सामोरे जात आहे, हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडून ठराविक वर्गाचे तुष्टीकरण केले जात असल्याचा आरोप करताना कन्हैयालाल हत्याकांडाचा मुद्दा भाजपकडून उचलला जात आहे. राज्यात रामनवमी, हनुमान जयंती असो अथवा दुसरा हिंदूंचा कोणताही सण असो, येथे तो शांततेने साजरा होऊ शकत नाहीत, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी भरतपूरच्या जाहीर सभेत केले होते. हिंदूंच्या सणांवेळी होणारा हिंसाचार व मिरवणुकांवरील दगडफेकींचा संदर्भ मोदी यांनी दिला होता. पंतप्रधानांची अशा प्रकारची वक्तव्ये म्हणजे ध्रुवीकरणाचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

मुस्लिमबहूल भागाकडे भाजपचे लक्ष आहे, असे नाही. पंतप्रधान मोदी यांचा येत्या मंगळवारी जयपूरमध्ये रोड शो होणार आहे. मुस्लिमबहूल तीन मतदारसंघांतून हा रोड शो जाणार आहे. अल्पसंख्याक वर्गाची मते हमखासपणे काँग्रेसकडे जातात, असे म्हटले जाते. तथापि मोदींच्या रोड शोमुळे काही फरक पडणार काय, हा औत्सुक्याचा विषय आहे. काँग्रेसने अवलंबलेल्या सॉफ्ट हिंदुत्वाची देखील चर्चा आहे. श्रावण महिन्यात शिवमंदिरांमध्ये अभिषेक, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा असे कार्यक्रम काँग्रेसने घेतले होते. मुख्यमंत्री गेहलोत यांनी आपल्या गॅरंटी यात्रेची सुरुवात मोतीडुंगरी येथील गणेश मंदिरापासून केली होती, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हाडौती आणि भरतपूर भागातील जाहीर सभांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. गतवेळी या भागात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भाजप यंदा चमत्कार करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हाडौती (कोटा) आणि भरतपूर विभागात विधानसभेच्या 36 जागा आहेत. राजस्थान कालवा परियोजनेचा (ईआरसीपी) मुद्दा कामी येईल, असा काँग्रेसचा विश्वास आहे. काँग्रेसने या मुद्द्यांवर ईआरसीपी यात्रा काढत परियोजनेला राष्ट्रीय दर्जा देण्यास केंद्र सरकारने आडकाठी आणल्याचा आरोप केला होता. माजी मंत्री रामगोपाल बैरवा तसेच पंकज मेहता या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे.

भाजपचा एकमेव मुस्लिम चेहरा काँग्रेसमध्ये

हाडौतीमध्ये भाजपचा एकमेव मुस्लिम चेहरा असलेले अमिन पठाण यांनी प्रवेश केल्याने काँग्रेसला थोडाबहुत दिलासा मिळाला आहे.
झालावाड आणि बारा या जिल्ह्यांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील आठपैकी सात मतदारसंघात शिंदे यांच्या मर्जीतल्या नेत्यांना तिकीट देण्यात आले आहे. वसुंधराराजे यांचे पुत्र दुष्यंतसिंह हे स्थानिक खासदार आहेत. झालावाडच्या चारही मतदारसंघांत भाजप मजबूत स्थितीत आहे. तर बारा जिल्ह्यातील छबडा मतदारसंघात भाजप आणि बारा शहर मतदारसंघात काँग्रेस चांगल्या स्थितीत आहे.

कोटा उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे वादग्रस्त नेते शांतीलाल धारिवाल यांना विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. भाजपचे दबंग नेते प्रल्हाद गुंजल यांच्याशी धारिवाल यांची लढत होत आहे. लाडपुरा मतदारसंघात तत्कालीन राजघराण्याच्या सदस्या कल्पना देवी भाजपतर्फे निवडणूक लढवित असून त्यांचा मुकाबला काँग्रेसच्या नईमुद्दीन यांच्याशी होत आहे. भाजपचे बंडखोर भवानीसिंह राजावत यांच्यामुळे कल्पना देवी यांना नुकसान होणार काय? याकडे सर्वांची नजर आहे.

Back to top button