Rajasthan Assembly Elections | राजस्थानात पुन्हा काँग्रेसच सत्तेत येईल : अशोक गेहलोत

Rajasthan Assembly Elections | राजस्थानात पुन्हा काँग्रेसच सत्तेत येईल : अशोक गेहलोत

राजस्थानात मतदार पुन्हा काँग्रेसलाच सत्ता मिळवून देतील, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला. भाजपने राजस्थानात सत्ता उलथविण्याचा प्रयत्न केला. कोव्हिडसारख्या काळात उत्तम प्रशासनाच्या माध्यमातून राजस्थानचा विकास केला आहे. त्यामुळे मतदार आगामी निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला सत्ता मिळवून देतील. 2020 साली भाजपने बंडखोरी घडवून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मतदार भाजपवर नाराज असून त्यांना अद्दल घडवितील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

वसुंधराराजे नाराज असल्याची चर्चा

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची रविवारी भेट घेतली. उभयतांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली. भाजपमधील श्रेष्ठींकडून अन्याय होत असल्याचा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींवर वसुंधराराजे नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

नवरात्रीमुळे 9 वाजून 9 मिनिटांचा मुहूर्त

मध्य प्रदेशात काँग्रेसने ज्योतिषशास्त्रज्ञाचा सल्ला घेऊन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी 9 वाजून 9 मिनिटांनी 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर 9 दिवसांना पवित्र मानले जाते. कुटुंब असो अथवा राजकारण, दोन्हींमध्ये शुभदिवस निवडण्याची आपली प्रथा आणि संस्कृती असल्याची माहिती काँग्रेस नेते के. के. मिश्रा यांनी दिली. नवदुर्गांच्या आशीर्वादामुळे 9 हा अंक शुभ मानला जातो. त्यामुळे रविवारी सकाळी 9 वाजून 9 मिनिटांचा मुहूर्त शोधल्याचे त्यांनी सांगितले.

मिझोराममध्ये राहुल गांधींची पदयात्रा

मिझोरामध्ये काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 7 नोव्हेंबर रोजी होणार्‍या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 39 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. काँग्रेस नेते राहुल गांधी मिझोरामच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. खासदार राहुल गांधी यांनी इस्रायल-हमास युद्धावरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मणिपूरऐवजी मोदी यांना इस्रायलची अधिक चिंता असल्याची टीका गांधी यांनी केली. 1986 साली ईशान्यकडील राज्यातील शांततेच्या करारावर स्वाक्षरी करून काँग्रेसने या राज्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मणिपूरमध्ये वांशिक कत्तली घडत असताना मोदी यांना फिकीर नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

वधूंना 10 ग्रॅम सोने

काँग्रेसने मुलींच्या लग्नात दहा ग्रॅम सोने, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदींसह विविध आश्वासनांचा जाहीरनाम्यात उल्लेख केला आहे. तत्पूर्वी, भारत राष्ट्र समितीचा जाहीरनामा वास्तववादी असल्याची माहिती बीआरएसच्या आमदार के. कविता यांनी दिली. स्वस्त दरात सिलिंडरसह कल्याणकारी योजनांचे आश्वासन बीआरएसने दिले आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसची बोलती बंद झाल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, माजी आमदार आणि भाजप नेत्या कुंजा सत्यवती यांचे निधन झाले. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

छत्तीसगडमध्ये अमित शहा प्रचार करणार

माजी मुख्यमंत्री रमनसिंग यांच्यासह चौघे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. 7 आणि 17 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत छत्तीसगड विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 2018 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला निर्विवाद 68 जागा मिळाल्या होत्या. भाजपला केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news