डॉक्‍टर बनला भाई… वॉर्डबॉयला हाड मोडेपर्यंत मारहाण, तक्रार दाखल | पुढारी

डॉक्‍टर बनला भाई... वॉर्डबॉयला हाड मोडेपर्यंत मारहाण, तक्रार दाखल

राजगुरूनगर ; पुढारी वृत्तसेवा

राजगुरूनगर जवळच्या चांडोली, (ता खेड जि पुणे) ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरने मित्रांसोबत येऊन वॉर्डबॉयला लाथाबुक्या व लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. डॉ केशव गुट्टे, (रा मोशी) असे मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव असून, मिथुन मोहन अडसूळ ( रा. न्यू सांगवी,पिंपळे गुरव) असे मारहाण झालेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. अडसूळ हा चांडोली ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये कार्यरत आहे.

दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत वॉर्डबॉयच्या हाताचे हाड मोडले आहे. एवढा प्रकार होऊन देखील सहकारी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पोलिस स्‍टेशनमध्ये हे प्रकरण जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. तसेच तक्रार दाखल केल्यास नोकरी जाईल,  या भीती पोटी वॉर्डबॉय उपचार सुरू असल्याने गप्प होता. सोमवारी (दि १५) खेड पोलिस स्‍टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेचा तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले करीत आहेत.

शासकीय रुग्णालय असलेल्या चांडोली ग्रामीण रुग्णालयात इमारतीत, डॉक्टर, कर्मचारी यांच्या राहण्यासाठी प्रशस्त खोल्या व सर्व सुविधा आहेत. उपचारासाठी लागणारी सर्व आधुनिक तंत्रज्ञान व साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. केवळ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची अनास्था, रुग्णांशी, नातेवाईकांशी अर्वाच्य भाषेत बोलणे यामुळे सर्व सुविधा असूनही लोक इकडे फिरकत नाहीत. काम न करणे आणि त्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवून टाळाटाळ करणे येथे सर्रास व नित्याचे झाले आहे. त्यात दोन महिन्यापूर्वीची ही घटना समोर आल्‍याने पुन्‍हा एकदा चांडोली ग्रामीण रुग्णालय चर्चेत आले आहे.

हेही वाचलं का ?

Back to top button