धुळे शहरात अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रवेश बंदी, हे आहे कारण | पुढारी

धुळे शहरात अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रवेश बंदी, हे आहे कारण

धुळे पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या हेतूने आता पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. शहरात सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान कोणत्याही अवजड वाहनाला बंदी करण्यात आलेली आहे. तर अल्पवयीन बालकांना देखील वाहन दिल्यास पालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर तेरा अल्पवयीन वाहन चालवणाऱ्या मुलां वर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर प्रतिबंधित वेळेत शहरात प्रवेश करणाऱ्या 24 अवजड वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

  • धुळे शहरात गेल्या आठवड्यामध्ये भरधाव ट्रक च्या अपघातात एका निष्पाप युवकाचा मृत्यू झाला.
  • या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

यापूर्वी धुळे शहरात सकाळी आठ ते रात्री आठ वाजे दरम्यान अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचे परिपत्रक जिल्हा पोलीस अधीक्षक स्तरावरून काढण्यात आलेले होते. मात्र त्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नवीन परिपत्रक जारी केले आहे. यात सकाळी सहा ते रात्री नऊ वाजे दरम्यान कोणत्याही अवजड वाहनांना धुळे शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी बांधकाम क्षेत्रातील वाहनांना दुपारी बारा ते चार वाजे दरम्यान सूट देण्यात आली होती .मात्र ही सूट देखील रद्द करण्यात आली आहे . या वाहनांना देखील रात्री नऊ वाजे नंतरच शहरात येता येणार आहे. केवळ दुपारी बारा ते चार वाजे दरम्यान जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच शहरात येण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

या मार्गावर सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत राहील प्रवेश बंदी

यात इंदौरकडून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना नगांवबारी चौक, देवपूरपासून धुळे शहरात, साक्रीरोड सुरतकडून येणाऱ्या अवजड वाहनांना कृष्णाई हॉटेल, साक्री बायपास पासुन धुळे शहरात, मुंबईकडून धुळे शहरात गुरुद्वाराकडून येणारे अवजड वाहनांना नवीन डीमार्ट पर्यंत प्रवेश राहील, त्यापुढे प्रवेश बंदी राहील. चाळीसगांव क्रॉस, 100 फुटी कॉर्नर पासुन अवजड वाहनांना धुळे शहरात, पारेाळा चौफुली, कृषी महाविद्यालयापासुन अवजड वाहनांना धुळे शहरात, तसेच बिलाडी रोड, जुने धुळे पासून धुळे शहरात, वरखेडी रोड पासून धुळे शहरात, वडजाई रोड पासून धुळे शहरात, चितोड रोड पासून धुळे शहरात, गोंदुर रोड पासुन धुळे शहरात, नकाणे रोड पासून धुळे शहरात सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रवेश बंदी राहील.

आदेश कुणाला लागू नाही ?

हा आदेश शासकीय वाहनांना तसेच राज्य परिवहन महामंडळाचे बस, स्कुल बस यांना लागु राहणार नाही. तसेच शहरात किराणा, भुसार, इतर जीवनावश्यक वस्तु यांना दुपारी 12 ते दुपारी 4 वाजेदरम्यान आदेशात सूट देण्यात येत आहे. बंदीच्या वेळे व्यतिरिक्त अवजड वाहनांची वाहतुक नेहमी प्रमाणे राहील. हा आदेश 28 मे, 2024 पासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या पथकाने पारोळा रोड, दत्त मंदिर चौक आणि बारा पत्थर परिसरात प्रतिबंधित वेळेत शहरात आलेल्या 24 अवजड वाहनांवर मोटार वाहन कायदा कलम 119 अंतर्गत दंडाची कारवाई केली. यानंतर या वाहनांना शहराच्या बाहेर पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यात 18 वर्षाखालील विद्यार्थी तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या विद्यार्थ्यां विरोधात मोटार वाहन कायदा कलम 3(1) 181 अंतर्गत 13 वाहन चालकांविरुद्ध केसेस करण्यात येऊन त्यांना प्रत्येकी 5000 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई मोहीम यापुढे देखील अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अठरा वर्षाखालील पाल्यांना तसेच परवाना नसलेल्या विद्यार्थ्यांना वाहन चालवण्यास देऊ नये, त्याचप्रमाणे अवजड वाहन चालक आणि मालक यांनी देखील प्रतिबंधित वेळेत अवजड वाहने शहरात आणून नये ,अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.

हेही वाचा –

Back to top button