किल्ले वासोटा : राज्‍यासह देशातील ट्रेकर्सची पसंती; पर्यटकांत लक्षणीय वाढ | पुढारी

किल्ले वासोटा : राज्‍यासह देशातील ट्रेकर्सची पसंती; पर्यटकांत लक्षणीय वाढ

बामणोली (सातारा) ; पुढारी वृत्तसेवा

सध्या थंडीची चाहूल लागली आहे. दरवर्षी हिवाळ्यात किल्ले वासोटा या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो ट्रेकर्स किल्ले वासोटा या ठिकाणी भेट देऊन ट्रेकिंगचा मनमुराद आनंद लुटत असतात. यावर्षी किल्ले वासोटा पर्यटनासाठी खुला झाल्यावर आजवर पाच हजारहून अधिक ट्रेकर्स पर्यटकांनी वासोटा या ठिकाणी भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला.

रविवार दि. ७ रोजी व्यसन मुक्त युवक संघ महाराष्ट्र, बंडातात्या कराडकर यांच्या चारशेहून अधिक लोकांनी व इतर जवळपास एक हजार ट्रेकर्स लोकांनी वासोटा पर्यटनाला पसंती दिली. त्यामुळे एकाच शनिवार आणि रविवारी तब्बल दोन हजारहून अधिक पर्यटकांनी किल्ले वासोटा ट्रेक केला.

किल्ले वासोट्याला येणाऱ्या ट्रेकर्स आणि पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

दुसरा शनिवार दि. १३ व १४ अशा सलग सुट्ट्या असल्याने या दोन दिवशी देखील एक हजारहून अधिक पर्यटक ट्रेकर्सनी वासोटा ट्रेक केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांबरोबर देशाच्या विविध राज्यातून वासोटा या ठिकाणी येणाऱ्या ट्रेकर्स व पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बहुतांश पर्यटक हे आदल्या दिवशी मुक्कामी येऊन सकाळी लवकर वासोटा या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी जात आहेत. किल्ला हा सातारा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याने घनदाट जंगलातून वाट काढत ट्रेक करत किल्ल्यावर चढाई करावी लागते. त्‍यामुळे वासोटा ट्रेकवेळी एक वेगळीच मजा येत असल्याचा अनुभव अनेक ट्रेकर्स सांगतात.

सह्याद्रीच्या डोंगररांगा पाहून पर्यटकांना आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद

किल्ल्यावर गेल्यावर किल्ल्यावर असणारी पाण्याची तळी, शंभू महादेव मंदिर, शिवकालीन कडेलोट करण्याचे ठिकाण बाबू कडा, ताई तेलीन वाड्याच्या चौथऱ्याचे अवशेष पाहून ट्रेकर्स लोकांचा आनंद द्विगुणित होतो. किल्ल्यावर गेल्यावर रत्नागिरी जिल्ह्याच्या बाजूकडील डोंगर, टेकड्या, सह्याद्रीच्या डोंगररांगा पाहून पर्यटकांना जणू आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद होतो. या ठिकाणी जाण्यासाठी बामणोली या गावामधून एक ते दीड तास बोट प्रवास करून पर्यटकांना वासोटा पायथ्याला जावे लागते. या नंतर ट्रेक करताना एक वेगळीच मजा येते. तर अलीकडे शेंबडी मठ व मुनावळे या ठिकानाहून देखील या ठिकाणी जाण्यासाठी बोट उपलब्ध असतात.

मात्र वासोटा पर्यटन एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहे की, भैरवनाथ बोट क्लब बामणोली येथील ९० बोट, ब्रविमश्वर महादेव शेंबडी बोट क्लब यांच्या ३० ते ३५ बोट तर केदारेश्वर बोट क्लब मुनावळे यांच्या २५ ते ३० बोटी असा सुमारे १५० हून अधिक बोटी पर्यटनासाठी कमी पडत आहेत.

वाडीवस्तीवर हॉटेल व्यवसाय, घरगुती न्याहारी व निवास योजना, टेंट व्यवसाय वाढला

एकीकडे पर्यटन वाढले तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर या संपूर्ण बामणोली, तापोळा, तेटली, वाकी, कोळघर, अंधारी, कास, बामणोली, पावशेवाडी, शेंबडी, मुनावळे, आंबवडे या गावांमध्ये व गावालगतच्या वाडीवस्तीवर हॉटेल व्यवसाय, घरगुती न्याहारी व निवास योजना, टेंट व्यवसाय वाढला आहे.

त्यामुळे जेवढ्या प्रमाणात पर्यटक या भागात वाढत आहेत. तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर हॉटेल पूरक व्यवसाय वाढल्याने पर्यटकांची चांगल्या प्रकारे निवासाची सोय होत आहे. किल्ले वासोटा पर्यटन वाढल्याने मुंबई स्थित बरेचसे युवक हे गावी येऊन बोट व्यवसायाला जोड धंदा हॉटेल व्यवसाय, मासेमारी करून आपले कुटुंब चालवत आहेत. वासोटा पर्यटनामुळे बामणोली, तापोळा या संपूर्ण भागामध्ये पर्यटनाला एक वेगळ्या प्रकारची चालना मिळाली आहे.

किल्ले वासोटा संवर्धनाची जबाबदारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने उचलावी.

किल्ले वासोटा पर्यटन स्थळ हे पूर्वी ज्यावेळी कोयना अभयारण्यात झाले त्यावेळी कोयना अभयारण्य हद्दीत येत होते. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आला. तेव्हापासून किल्ले वासोटा हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट झाला. किल्ले वासोटा या ठिकाणी जाण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बामणोली कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते.

ती पूर्वी बामणोली या ठिकाणी मिळत होती तर आता तीच परवानगी किल्ले वासोटा पायथा मेट इंदवली या ठिकाणी दिली जाते. यासाठी या कार्यालयाकडून प्रति व्यक्ती ३० रुपये प्रवेश शुल्क, १५० रुपये बोट पार्किंग प्रति बोट, ३०० रुपये पर्यटक मार्गदर्शक (गाईड) प्रति बोट एक असणारी व्यक्ती असे शुल्क या कार्यालयाकडून आकारले जाते.

या शुल्कातून या कार्यालयाला वर्षाकाठी लाखो रुपयांचा निधी जमा होतो. तर शासनाकडून विविध योजनांच्या नावाखाली येणारा निधी हा लाखात नसून कोटीत आहे. त्यामुळे किल्ले वासोटा संवर्धनाची जबाबदारी ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने उचलावी अशी मागणी होत आहे.

Back to top button