Maratha Reservation : बससेवा बंदच; प्रवाशांचे हाल | पुढारी

Maratha Reservation : बससेवा बंदच; प्रवाशांचे हाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून, काही ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यात मराठवाडा आणि इतर काही भागांत बससेवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शिवाजीनगर आगारातून तीन दिवसांपासून मराठवाड्यातील एसटी सेवा पूर्णपणे बंदच आहे. त्यामुळे एसटीला जवळपास 80 लाखांचा फटका बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 बीड, परभणी, पंढरपूर व इतरही भागांत एसटी बस जाळण्यात आल्या तसेच तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सुरुवातीला पुण्यातून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नादेड, परभणी, लातूर, धाराशिव येथील बससेवा बंद करण्यात आली आहे.
परंतु, आंदोलनाची तीव्रता वाढल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी पुण्यातील दोन्ही आगार आणि पुणे विभागातील इतर आगारांतील एसटीची सेवा काही प्रमाणात बंद करण्यात आली. यामुळे गावी जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले.
प्रमुख मार्गांवरील बससेवा बुधवारीही बंद केल्याने एसटीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांत रद्द केलेल्या 1600 फेर्‍यांमुळे पुणे विभागाला जवळपास 80 लाखांचा तोटा झाला आहे.
पुण्यातील शिवाजीनगरातून नाशिक मार्गावर बससेवा सुरू आहे. तर इतर मार्गांवरील सेवा बंद आहेत. तर स्वारगेट आगारातून सोलापूर, सांगली, पंढरपूर व कर्नाटक राज्यात जाणारी एसटी सेवा बंद करण्यात आली. सध्या स्वारगेट आगारातून मुंबई आणि कोकण मार्गावर बस सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तीन दिवसांत 1600 फेर्‍या रद्द

पुण्यातील शिवाजीनगर आगारातून मराठवाडा व विदर्भात ये-जा करणार्‍या, तर स्वारगेट आगारातून सोलापूर, सांगली, पंढरपूर व इतर मार्गांवरील फेर्‍या तीन दिवसांपासून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे विभागातून तीन दिवसांत जवळपास एकूण 1600 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा

Back to top button