हिंगोली: मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; अकोला मार्ग झाला ठप्प, हजारो वाहने अडकली | पुढारी

हिंगोली: मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; अकोला मार्ग झाला ठप्प, हजारो वाहने अडकली

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्रमुख मार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि,२) हिंगोली -अकोल राष्ट्रीय महामार्गावर बासंबा फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे हजारो वाहने अडकून पडल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. हिंगोलीतही सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजीक आमरण उपोषण करण्यात आले. शिवाय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हिंगोलीत तहसीलसमोर रेल्वे उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. याच मार्गावर पुढे बळसोंड येथे रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी रास्ता रोको केला. यात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले हेते.

त्यानंतर बासंबा फाट्यावरही राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने हजारो वाहने या ठिकाणी दोन्ही बाजूंनी अडकून पडल्याचे पहायला मिळाले. मागील दोन तासांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या रांगा वाढतच चालल्याचे पहायला मिळत आहे. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत. तसेच मान्यवरांकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणे कसे गरजेचे आहे, हे मांडण्यासाठी भाषणेही केली.

याप्रसंगी आंदोलकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व अँड.गुणवंत सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे फलक दर्शवून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी परिसरातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी खबरदारी म्हणून पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वाहनांच्या गर्दीतून ऍम्ब्युलन्सला दिली वाट

सेनगाव हिंगोली रिसोड महामार्गावरील शहरातील जिंतूर टी पॉईंटवर गुरुवारी मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत मुख्य रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी जवळपास तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान मराठा बांधवांकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलना दरम्यान वाहनांच्या गर्दीतुन ऍम्ब्युलन्सला वाट करून दिल्याने समाजात वेगळा आदर्श घालून दिला.

हेही वाचा:

Back to top button