सांगली : कृष्णा कोरडी; अनेक गावांचा पाणीपुरवठा ठप्प | पुढारी

सांगली : कृष्णा कोरडी; अनेक गावांचा पाणीपुरवठा ठप्प

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा पिण्याचा व सिंचन योजनांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक हैराण झाले आहेत. कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत आज (दि. 26) सातारा येथे तेथील पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यानंतर पाणी सोडण्यात येणार आहे.

यंदा ऐन पावसाळ्यात नदीचे पात्र कोरडे पडले होते. गणपती विसर्जनावेळीही नदीत फार कमी पाणी साठा होता. त्यावेळी जोरदार दंगा झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक झाली. या मागणीची दखल घेत कोयना धरणातून 1050 क्यूसेक पाणी
नदीपात्रात सोडले होते. त्यानंतर काही दिवसांतच पाणी सोडण्याचे थांबवले.

सध्या ऑक्टोबर हिट असल्याने पिकासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पाणी उपशासाठी मागणी वाढत आहे. अनेक ठिकाणी पात्र कोरडे पडल्याने बहुतेक पाणी योजनाही ठप्प आहेत. काही ठिकाणी शेतकरी, ग्रामस्थ पात्रातील खोलगट भागात पाईपचा फुटव्हॉल्व्ह ठेवण्यासाठी धडपडत आहेत. अनेक ठिकाणी पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांकडे तगादा लावला जात आहे. पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या येथील अधिकार्‍यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी, तोंडी मागणी केली. त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची पाण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. नदीत पाणी सोडण्याची मागणी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे काही लोकप्रतिनिधींनी केली असता, त्यांनी रविवारी (दि. 29) कालवा समितीची बैठक बोलविली आहे, असे सांगितले.

पाण्याला दुर्गंधी

कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने व नदीकाठावरील गावातील सांडपाणी नदीपात्रात सोडल्याने नदीतील पाण्यास दुर्गंधी आहे. पर्याय नसल्याने अनेकजण तेच पाणी वापरत आहेत. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे.

पाणी येण्यासाठी तीन- चार दिवस लागणार

कोयनेतून उद्या पाणी सोडण्याची शक्यता आहे. ते सांगलीपर्यंत पोहचण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे अजून दोन-तीन दिवस नागरिकांना हाल सहन करावे लागणार आहेत.

सांगलीचे राजकीय वजन घटले

एकेकाळी सांगलीचा राजकीय दबदबा संपूर्ण राज्यावर होता. अनेक निर्णयांच्या घोषणा सांगलीत होत होत्या. आता मात्र कोयनेतून नदीत पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याकडून सातत्याने मागणी होऊनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे सांगलीचे राजकीय वजन घटल्याची चर्चा आहे.

कृष्णा काठावरील 70 पाणी योजना बंद

कृष्णा नदीवरती सांगलीपासून ओगलेवाडी पर्यंत एकूण 82 पाणी योजना आहेत. त्यापैकी 70 पाणी योजना या नदीपात्रात पाणी नसल्याने बंद झालेल्या आहेत. त्यामुळे या पाणी योजना वर अवलंबून असलेल्या अनेक गावातील पाणीपुरवठा ठप्प झालेला आहे

जिल्ह्यासाठी पाणी कपातीचा प्रस्ताव

सांगली जिल्ह्यास सिंचन व पिण्यासाठी 48 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी सांगली पाटबंधारे विभागाने केलेली आहे. तसा प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला आहे. मात्र सांगली साठी 32 टीएमसी पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे . त्यातूनच सध्या सांगलीला सोडण्यात येणारे पाणी अडवले असल्याची चर्चा आहे

Back to top button