गोवा : दिवाळीच्या सुट्टीत शाळांमध्ये जादा वर्ग; विद्यार्थ्यांना सुट्टीतही जावे लागणार शाळेत | पुढारी

गोवा : दिवाळीच्या सुट्टीत शाळांमध्ये जादा वर्ग; विद्यार्थ्यांना सुट्टीतही जावे लागणार शाळेत

मडगाव; रविना कुरतरकर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे शिक्षण खात्याने दिवाळी सुट्टीमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना 25 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण होते. मात्र काही विद्यार्थ्यांचा अभासक्रम नियमित वर्गात शिकवून पूर्ण न झाल्याने सुट्टीच्या दिवसांत दोन तासाचे अतिरिक्त वर्ग ठेवले आहे. विद्यार्थ्यांना सुट्टीतही शाळेत जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

यंदा दिवाळी सुट्टी 8 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र राज्यात 25 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी विद्यार्थ्यांना 25 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी देण्याचा निर्णय घेऊन परिपत्रक जाहीर केले आहे. दि. 25 ऑक्टोबरपासून राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू होणार. या स्पर्धांचा शालेय विद्यार्थ्यांना लाभ घेता यावा यासाठीच शिक्षण खात्याने यंदा दिवाळीची सुट्टी 25 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत देण्याचे निश्चित केलेले आहे.

दिवाळीच्या सुट्टीचे दिवस वाढल्याने विद्यार्थी आनंदात होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत फिरायला जाण्याचा बेतही ठरवला होता. तर काही विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपली नाव नोंदणी केली होती. परंतु, काही शाळांनी संपूर्ण दिवाळी सुट्टीच्या दिवसांत अतिरिक्त वर्ग ठेवले असल्याने विद्यार्थ्यांची हिरमोड झाली आहे.

केपे येथील एका शाळेतील विद्यार्थ्याने पुढारीशी बोलताना नाव उघड न करण्याचा अटीवर दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला शिक्षण खात्याने सुट्टी जाहीर केली आहे असे, सांगितले होते. मात्र त्यानंतर शिक्षकांनी आम्हाला दर दिवशी दोन ते तीन तासाच्या अतिरिक्त वर्गात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहे. पुढच्या परीक्षांचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळणार नाही. यासाठी संपूर्ण दिवाळीच्या सुट्टीमध्ये अतिरिक्त वर्ग घेण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे.

सासष्टीतील एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्टीत घेतले जाणारे अतिरिक्त वर्ग इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. या वर्गात गैरहजर राहिल्यास पुढच्या परीक्षेत बसण्याची परवानगी प्राप्त होणार नाही असे सांगून अतिरिक्त वर्गात हजेरी लावण्याची सक्ती शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर लादली असल्याचे त्यांनी सांगितले. तर काही शिक्षकांनी परीक्षेच्या दरम्यान गुण कमी दिले जाणार असल्याचे सांगितल्याने परीक्षेच्या भीतीपोटी तरी विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवसांत शाळेत जावे लागणार आहे.

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाची गरज

विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात पाहून या संधीचा अनुभव घ्यावा यासाठी सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहे. दरम्यान, यासाठी 270 बसेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून ठेवल्या आहेत. शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या घाईत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धापासून दूर करू नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

Back to top button