कोल्हापूर: भादोले- वाठार रस्त्यासाठी अधिकाऱ्यांना काळे फसण्याचा स्वाभिमानी संघटनेचा इशारा | पुढारी

कोल्हापूर: भादोले- वाठार रस्त्यासाठी अधिकाऱ्यांना काळे फसण्याचा स्वाभिमानी संघटनेचा इशारा

किणी: पुढारी वृत्तसेवा : भादोले- वाठार रस्त्यातील खड्ड्यामुळे वर्षांत ७२ अपघात झाले आहेत. तरीही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भादोले येथे कार्यकर्त्यांनी ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे म्हणाले की, या रस्त्यासाठी वर्षभरापासून संबंधितांकडे पाठपुरावा करत आहोत. पण अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत काहीही केलेले नाही.साखर कारखाने सुरू होणार आहेत. यावेळी तर या रस्त्याने वाहन चालवणे फारच अडचणीचे होणार आहे. या रस्त्यावर ट्रॅक्टर अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हा रस्ता पेठ वडगावमधून जाणाऱ्या वाहनांना ट्राफिकची अडचण होते. म्हणून या रस्त्याचा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील लोक वापर मोठ्या प्रमाणात करतात. रस्ता दुरुस्त झाला नाही तर अपघातांची संख्या वाढणार आहे. तरी आठ दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा कांबळे यांनी यावेळी दिला.

रास्ता रोको आंदोलनावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून अधिकाऱ्यांचा निषेध केला. यावेळी उपअभियंता एन. के. कांबळे यांनी या महिन्यात काम सुरू करीत असल्याचे लेखी आश्वासन दिले. आंदोलनस्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब एडके, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील, सरचिटणीस शिवाजी पाटील, अण्णा मगदूम, संभाजी पाटील, राहुल पाटील, प्रवीण घोरपडे, बंडा पाटील, सुधीर मगदूम, विक्रम माने, अभय पाटील, उमेश पाटील, विनायक पाटील, विष्णू सुतार, सत्वशील जाधव, सचिन पाटील, सचिन नांगरे, विजय पाटील, हेमंत पाटील, संतोष पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button