

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूरमधील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी सोमवारी (दि.२०) महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्यावर ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजचा त्यांचा सिटी स्कॅन रिपोर्टही चांगला आहे. पी. एन. पाटील यांची प्रकृती स्थिर असून कालच्यापेक्षा आज त्यांच्यात सुधारणा होत आहे, अशी माहिती डॉ. सुहास बिरजे, डॉ. अजय केणी, डॉ. बराले, डॉ. पाटील आणि राजेश पी. पाटील व राहुल पी. पाटील यांनी दिली.
आमदार पी. एन. पाटील रविवारी सकाळी निवासस्थानी बाथरूममध्ये तोल जाऊन पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई आणि कोल्हापूर येथील विशेष वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया केली. आमदार पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे अॅस्टर आधार प्रशासनाने दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. गेल्या आठवडाभरापासून त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता.
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारात आमदार पी. एन. पाटील सक्रिय होते. संपूर्ण मतदार संघ त्यांनी पिंजून काढला होता. मतदानापूर्वी काही दिवस त्यांना थकवा जाणवत होता. यामुळे ते काही दिवस घरी थांबले. कमी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. काही चाचण्याही करण्यात आल्या. ते घरीच उपचार घेत होते. शनिवारी रात्रीही त्यांना घरी सलाईन लावण्यात आली होती. ते रविवारी सकाळी बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले.
त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर रविवारी दुपारी विशेष विमानाने कोल्हापुरात आले. कोल्हापूर व मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आमदार पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया केली.
आमदार पी. एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यानंतर जिल्ह्यातील कानाकोपर्यातून कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात दाखल झाले. यामुळे रुग्णालयाच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आमदार पाटील यांची तब्येत कशी आहे, यांची विचारणा कार्यकर्ते करत होते.
हे ही वाचा :