Hingoli : सेनगाव तहसील कार्यालयावर सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी समितीचा आक्रोश मोर्चा | पुढारी

Hingoli : सेनगाव तहसील कार्यालयावर सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी समितीचा आक्रोश मोर्चा

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा: येथील तहसील कार्यालयावर कंत्राटी नोकरभरती बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.३) सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी समितीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

सध्या केंद्र व राज्य सरकारकडून कंत्राटी पध्दतीने नोकरभरती केली जात आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटी पध्दतीने होणाऱ्या भरतीमध्ये घोटाळे उघडकीस येऊ लागले आहेत. स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी मानसिक ताण-तणावामध्ये जीवन जगत आहेत.

यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात कंत्राटी पध्दतीने सरकारी नोकरी भरतीचा जीआर रद्द करावा, के.जी. ते पी.जी. पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण मिळावे, सरळ सेवा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एस.टी, रेल्वे प्रवास मोफत करण्यात यावा, सरळ सेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे अव्वाच्या सव्वा शुल्क बंद करून सरसकट सर्वांना प्रत्येकी शुल्क १०० रुपये आकारण्यात यावे, ६२ हजार सरकारी शाळेचे होणारे खाजगीकरण रद्द करावे, मुक्त विद्यापीठ मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा फी शुल्क कमी करावे, सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, परीक्षा पारदर्शकतेमध्ये घेण्यात याव्यात, स्पर्धा परीक्षेचे केंद्र सोयीचे द्यावे आदी मागण्यां करण्यात आल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष अनिल पतंगे, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदेश देशमुख, राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख आदीसह तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा 

Back to top button