

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा: मागील काही दिवसांपासून शहरामध्ये डेंग्यूसदृश्य तापाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तरीही नगरपंचायती प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. वारंवार सांगूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. याच्या निषेधार्थ नगरसेविका राधा देशमुख यांचे पती भाजप नेते श्रीराम देशमुख यांनी आज (दि.३) नगरपंचायतीला टाळे ठोकले.
राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी जोशी यांना धूर फवारणीसाठी सांगितले होते. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्यावर मुरूमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. पण पंधरा दिवसांपासून हे ढिगारे तसेच आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखेर नगरपंचायतीला देशमुख यांनी टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला.
नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी जोशी यांना धूर फवारणी करण्याबाबत वारंवार विनंती केली. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शहरात तापाची साथ सुरू झाली आहे. डेंग्यूचा पादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासन घेणार का ?
– श्रीराम देशमुख, भाजप नेते
हेही वाचा