पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी; गटारीचे काम लवकर करण्याची नागरिकांची मागणी | पुढारी

पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी; गटारीचे काम लवकर करण्याची नागरिकांची मागणी

पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा : पहिल्याच पावसामध्ये मुळशी तालुक्यातील मुख्य चौक असलेल्या घोटावडे फाट्यावर पाण्याचे डबके साठले. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे नूतनीकरण नुकतेच झाले आहे. परंतु, हे काम एका पातळीत न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साठत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात माती साठली आहे. मातीमुळे पावसाचे पाणी गटारात जात नाही. या मुख्य चौकामध्ये गटाराचे कामच झालेले नाही. रस्ता रुंदीकरण करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराचे काम करणे गरजेचे होते. ते ठेकेदाराने न केल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सर्वाधिक वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या चौकामध्ये तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात अनेक मोठे औद्योगिक कारखाने आहेत. कारखान्यांमध्ये जाणारी अवजड वाहने, कामगारांच्या बस, दुचाकीवरून जाणारे कामगार यामुळे या चौकात कायमच वर्दळ असते. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थीही बस थांब्यावर थांबलेले असतात.अनेकदा मोठ्या गाड्या पाण्यातून गेल्यानंतर घाण पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते. त्यामुळे या समस्येवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने पाठपुरावा करून उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. हे काम पावसाळा सुरू होण्याअगोदर न केल्यास संपूर्ण पावसाळ्यात हा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा

Back to top button