Politics : राजकीय हालचालींना वेग; संजय राऊत शरद पवारांना भेटले! | पुढारी

Politics : राजकीय हालचालींना वेग; संजय राऊत शरद पवारांना भेटले!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सध्या मुंबईत राजकीय (Politics) हालचालींना वेग आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या राजकीय (Politics) बैठका सुरु आहेत.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. तसेच महागाईचा मुद्दा ऐरणीवर आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सध्याचा कार्यकाल पूर्ण करेलच; पण विधानसभेच्या पुढील निवडणुकीनंतरही पुन्हा सत्तेत येईल, असा दावा अनेकवेळा शरद पवार यांनी केला आहे.

दरम्यान, इंधन दर कपातीवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत. “राज्य सरकार दर वाढवत नाही. राज्य सरकार या महागाईविरोधात आहे. पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी करून काय होणार? किमान २५ रुपयांनी कमी करायला हवे होते. १०० रुपये वाढवायचे आणि त्यातील ५ रुपये कमी ही खेळी आहे. पेट्रोलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार आहे. इंधन दरवाढीतून कोट्यवधी रुपये कमविले”, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्रावर केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : गावात लाईट आली आणि साजरा झाला खरा दीपोत्सव | Diwali2021

Back to top button