

सय्यद मुश्ताक अली (Syed Mushtaq Ali Trophy) टी-२० ही देशांतर्गत स्थानिक क्रिकेटमधील प्रतिष्ठेची स्पर्धा सध्या सुरु आहे. या स्पर्धेतील महत्वाचा सामना सोमवारी आंध्र प्रदेशमधील मंगलगिरीमध्ये खेळण्यात आला. या सामन्यात असे काही झाले की सर्वजण आश्चर्यचकित झाले. या सामन्यात विदर्भाचा २९ वर्षीय गोलंदाज अक्षय कर्नेवार (Akshay Karnewar) याने टी-२० क्रिकेटमध्ये नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. विदर्भ क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या विदर्भने मणिपूरच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. जितेश शर्मा ३१ चेंडूत नाबाद ७१ धावा, अपूर्व वानखेडे १६ चेंडूत नाबाद ४९ धावा आणि अथर्व तइडे याच्या २१ चेंडूत ४६ धावांच्या जोरावर २० षटकांत केवळ ४ विकेट गमावून २२२ धावांचा डोंगर उभा केला होता. पण मणिपूरला हे मोठे लक्ष्य गाठताना विदर्भाच्या भेदक गोलंदाजीचा सामना करावा लागला. यात अक्षय कर्नेवार महत्वाची भूमिका पार पाडली.
डावखुरा स्पिनर अक्षय कर्नेवारने ((Akshay Karnewar) ४ ओव्हरमध्ये २ विकेट घेत एकही धाव दिली नाही. त्याने चार ओव्हर मेडन टाकल्या. ही कमाल पहिल्यांदाच टी-२० क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाने केली आहे. ४ ओव्हरमध्ये एकही धाव न देणारा तो जगातला पहिला गोलंदाज ठरला आहे. अक्षय आणि अन्य गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे मणिपूरचा डाव केवळ ५५ धावांत आटोपला आणि विदर्भाने १६७ धावांनी हा सामना जिंकला.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेची सुरुवात २००६ मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत १५ वर्षांत कोणत्याही टीमने इतका मोठ्या विजयाची नोंद केली नव्हती. विदर्भाने मणिपूरला तब्बल १६७ धावांनी हरविले. मणिपूरचे ९ फलंदाज दहाचा आकडाही पार करु शकले नाहीत. याआधी या स्पर्धेत ११२ धावांनी सामना जिंकण्याचे रेकॉर्ड आहे. दिल्ली आणि गुजरात यांच्यातील सामन्याचे हे रेकॉर्ड आहे.
अक्षय कर्नेवार याचा जन्म १२ ऑक्टोबर १९९२ रोजी महाराष्ट्रातील वाघोली येथे झाला. २९ वर्षीय अक्षय सध्या विदर्भ संघाकडून क्रिकेट खेळत आहे. त्याने २०१५ मध्ये विजय हजारे चषक स्पर्धेतून पदार्पण केले. ३ जानेवारी २०१६ रोजी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याला पहिल्यांदा टी-२० खेळण्याची संधी मिळाली. त्याने उजव्या हाताने ऑफ स्पिनर म्हणून गोलंदाजीस सुरुवात केली. पण त्याला डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासही प्रोत्साहन मिळाले. सध्या तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. २०१७-१८ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये त्याने पंजाब विरुद्ध ४७ धावा देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. तर २०८-१९ मध्ये विजय हजारे ट्रॉफी दरम्यान त्याने ७ सामन्यांत १५ विकेट घेतल्या. यामुळे सर्वांधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.