बारामतीत ताई की वहिनी? निर्णय मतदानयंत्रात..! जाणून घ्या किती टक्के झाले मतदान | पुढारी

बारामतीत ताई की वहिनी? निर्णय मतदानयंत्रात..! जाणून घ्या किती टक्के झाले मतदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित झालेल्या बारामती मतदारसंघाकरिता मंगळवारी मतदान पार पडले. यामध्ये सरासरी 56.07 टक्के असे सरासरी मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता सुप्रिया सुळे (ताई) की सुनेत्रा पवार (वहिनी) लोकसभेत जाणार यासंबंधीचा निार्णय आज मतदानयंत्रात बंद झाला. सकाळी सातपासूनच मतदारांच्या रांगा होत्या. काही केंद्रावर सायंकाळी सहानंतरही उशिरापर्यंत मतदान झाल्याने अंतिम टक्केवारीला उशिरा लागला. दरम्यान, बारामतीत 2014 मध्ये 58.83 टक्के, तर 2019 मध्ये 61.7 टक्के मतदान झाले होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी साडेनऊच्या सुमारास सरासरी 5.77 टक्के मतदान झाले होते. तर साडेअकरापर्यंत हा टक्केवारीचा आकडा 14.64 टक्क्यावर पोहचला होता. दुपारपर्यंत सरासरी 27.55 टक्के मतदान झाले होते. यामध्ये बारामतीमधील टक्का अधिकचा असल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले. उष्णतेचा पारा चढल्यामुळे दुपारच्या वेळी मतदान जरा मंदावले. दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा आकडा 34.96 टक्क्यावर पोहचला. तर पाच वाजेपर्यंत 45.68 टक्के मतदान पार पडले होते. उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. त्यानंतर उशिरापर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढत गेली. उशिरापर्यंत रांगा असल्याने प्रशासनाची दमछाक होत होती. रात्री उशिरा सरासरी 56.07 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आयटीमध्ये मतदानास संमिश्र प्रतिसाद.

हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी आणि परिसरात मंगळवारी (दि. 7) बारामती लोकसभा निवडणुकीसाठी
मतदान झाले. याला मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. येथील काही बूथवर दुपारी 1 वाजेपर्यंत 35 टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक मतदान झाले होते. त्यामुळे बूथवरील कार्यकर्त्यांनी मतदारांना घराबाहेर पडून मतदान करावे, यासाठी फोन करण्यास सुरुवात केली. मे महिन्यातील कडक उन्हामुळे अनेकांनी सकाळी मतदान करण्यास प्राधान्य दिले. उन्हातदेखील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रावर मेडिकल किट, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, पाण्याची सुविधा आणि मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती.

माणमध्ये मतदान यंत्र पडले बंद

माण येथील बूथ क्रमांक 65 मधील मतदान यंत्र बंद पडले होते. सुमारे अर्धा तास येथे मतदान प्रक्रिया बंद होती. त्यामुळे उपस्थित मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा दुसरी मशीन बसवण्यात आली. तदनंतर मतदान सुरळीत सुरू झाले.

अनेक मतदारांचे नावे गायब

आयटी परिसरात असलेल्या अनेक मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्याचे प्रकार मारुंजी आणि माण, हिंजवडी येथे घडत होते. अनेकांची नावे शोधण्यात यामुळे अडचण निर्माण होत होती. परिणामी निराश होऊन काही मतदार निघून गेले.

मारुंजी येथे हमरीतुमरीमुळे काही काळ तणाव

सकाळच्या सत्रात मतदारांची संख्या कमी होती. मात्र बूथ वरील अनेक कार्यकर्ते बाहेर फिरत होते. त्यामुळे मारुंजी येथील काही पदाधिकार्यांनी यास आक्षेप घेतला. त्यामुळे मारुंजी येथील सहा बुथवर काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर मतदान सुरळीत पार पडत होते.

एनसीसी केडर्स झाले स्वयंसेवक

माण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सुरू असलेल्या मतदानप्रक्रियेत येथील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करीत होते. या वेळी अनेक दिव्यांग मतदारांना त्यांनी सहकार्य केले.

सुप्रिया सुळे – सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत…

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये थेट लढत पहायला मिळाली. बारामती मतदारसंघात तब्बल 38 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ईव्हीएम मशिनमध्ये बंद झालेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे.

  • ईव्हीएमची पूजा केल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
  • बारामती मतदारसंघात 28 तक्रारी दाखल
  • मतदान केंद्र सापडत नसल्याने उडाला गोंधळ
  • वडगावात तीनदा मतदान यंत्र पडले बंद
  • नवमतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क

फूल दिसले नाही म्हणून मतदान नाही…

ईव्हीएम मशिनवर फूल नाही. कमळ हे चिन्हच नाही. उमेदवार नाही, तर त्याला आम्ही काय करणार? कमळचे चिन्ह नाही, तर आम्ही कसे मतदान करायचे? असा संताप आजोबांनी धायरीमधील चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावर व्यक्त केला.

हेही वाचा

Back to top button