World Tourism Day : ‘एकटी’ चलो रे… जाणून घ्या ‘सोलो ट्रॅव्हलर’च्या प्रवासाची गोष्ट | पुढारी

World Tourism Day : 'एकटी' चलो रे... जाणून घ्या 'सोलो ट्रॅव्हलर'च्या प्रवासाची गोष्ट

सोनाली जाधव :

पोरीच्या जातीने कशाला फिरायचं ? एकटी-दुकटीने प्रवास करायचे दिवस आहेत का आता…? फिरुन काय मिळणार आहे, कशाला पैसे खर्च करायचे, हिच्या पायाला काय भिंगरी लावली आहे का? असे एका ना दाेन असंख्‍य प्रश्‍न पाेरींना विचारताना तुम्‍ही ऐकले असतील; पण याकडे दुर्लक्ष करत काही मुली आणि महिला सोलो ट्रव्हलिंगची  आपली आवड जपत राहतात. आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त जाणून घेवूया सोलो ट्रव्हलिंग करणाऱ्या कोल्हापुरच्या कविता जांभळे हिच्या प्रवासाची गोष्ट (World Tourism Day)

संबधित बातम्या

प्रवास माणसाला समृद्ध करतो…

बी.ई झालेली कविता जांभळे मौजे वडगावची. (जि. कोल्हापूर)  घरी आई-बाबा आणि मोठा भाऊ. वडिल खाजगी दवाखाण्यात जनरल प्रॅक्टिस करत होते (निवृत्त) तर आई खाजगी बँकेतून निवृत्त झाली आहे.  शाळेत असताना खेळ, एनसीसी, इतर स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची. त्यानिमित्ताने विविध कॅम्प, स्पर्धांसाठी महाराष्ट्रभर फिरणे होत राहायचं. त्यामुळे वेगवेगळी भौगोलिक ठिकाणे, तेथील लोकांची जीवनशैली, खाद्यसंस्कृती अनुभवता आली. त्यातूनच विविध ठिकाणे, तेथील लोकं, संस्कृती जाणून घेण्याची उत्सुकता वाढत गेली. त्यामुळे माझा प्रवास हा वाढतच गेला, असं कविता सांगते. या इच्छेतून तिने आतापर्यंत ४० हून अधिक गडकिल्ले, विविध जंगल भटकंती, पाचहून अधिक राज्यांमध्ये प्रवास केला आहे. बाईक रायडिंग, ट्रेकिंग, बोटिंग, फोटोग्राफीची आवड असलेली कविता सांगते “प्रवास माणसाला समृद्ध करतो आणि माझ्या या प्रवासाचा प्रवाह कायम राहील….”

World Tourism Day : पहिला सोलो ट्रॅव्हल

कविताने पहिल्यांदा सोलो ट्रॅव्हल हा २०१५ मध्ये केला. तो होता उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद हा. त्यानंतर तिने कोकण, उत्तर प्रदेश मधील काही भाग, पाँडिचेरी, दिल्ली, पांडवगड या ठिकाणी सोलो ट्रॅव्हल केलं आहे. कविता सोलो ट्रॅव्हल करतेच; पण विवीध ग्रुपच्या माध्यमातूनही प्रवास करत असते. कविता सांगते प्रवास करत असताना माझ्या बाबतीत कधी अनुचित प्रसंग नाही घडला; पण प्रवास करत असताना वॉशरुमची मात्र गैरसोय होत राहते.

 

World Tourism Day : लोकं आधी नावं ठेवतात. नंतर अभिमानाने बोलतात…

सोलो ट्र्रॅव्हल करत असताना तुला कधी विरोध झाला का? किंवा कोणाच्या टीकेला सामोरे जावे लागले का? याबद्दल बोलत असताना कविता सांगते “विरोध असा कधी झाला नाही, पण मी कुठे सोलो ट्र्रॅव्हल करायला चालले की, सुरुवातीला आई घाबरते. पण मी ट्रॅव्हल करुन आले की, ती सर्वांना माझ कौतुक करत सांगत राहते. बाहेर कोणाकडून विरोध झाला तरी मी फारसं लक्ष देत नाही. माझा आतापर्यंतच असा अनुभव आहे की, लोकं आधी नाव ठेवतात. नंतर अभिमानाने बोलत असतात.”

मला ‘माझा’ शोध घेतला पाहिजे; म्हणून

कविताने मार्च २०२३ मध्ये पॉंडिचेरीची सोलो ट्रीप केली. याबद्दल बोलताना ती म्हणाली की,” मला माझा शोध घेतला पाहिजे आणि त्या शोधासाठी भटकत फिरण आलचं. त्यामुळे पैसे साठवले आणि फिराण्यावर खर्च केले. आमची गणितच वेगळी. कोणाला आपण काय आहोत हे सिद्ध नाही करायचं मात्र स्वतःला शोधायचं आहे. बाकी आपोआप आपण काय़ आहोत हे सिद्ध होत राहतो. याच शोधातून निघाली माझी छोटी पाँडिचेरी सोलो ट्रीप.

पॉंडिचेरी सोलो ट्रीप दरम्यान कविताने एका पुस्तक स्टॉलचा काढलेला फोटो

पाँडिचेरी सोलो ट्रीपबद्दल कविता सांगते,” पाँडिचेरीला गेल्यावर तिथे काय बघायचं हे ठरवलं नव्हतं. फक्त मिळेल त्या वाटेवर जायचं एवढचं ठरवलं होतं. तिथे ऑरोविल या ठिकाणी ‘मी’पण शोधायला माणसं येतात आणि वर्षानुवर्षे इथेच रहातात. तिथला भाग बनतात.  रिटायरमेंटच ठिकाण म्हणजे ऑरोविला. वयाच्या कितव्याही वर्षी रिटायर होऊन इथे आला की, फक्त तुमच्या अंगाला चिकटलेले इमोशन्स हळूहळू गळून पडतील. जसे की, राग, मत्सर, द्वेष, पैसा सगळ सोडून देतो; पण याचा अर्थ हा नाही की तुमचं काहीच नाही. तुमचं असतं फक्त अस्तित्व. ज्यासाठी आपण आयुष्यभर जगत असतो.  ‘मी पणा’ न करताही इथे ‘मीपण’ मिळतं.

माणसं आणि आजूबाजूची दुकानं बघण्यात मला रस…

कविता सांगते, “मी कुठेही प्रवासाला गेले की, मला मार्केटमध्ये वस्तू घेण्यापेक्षा तिथली माणसं आणि आजूबाजूची दुकानं बघण्यात रस असतो. मग एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीतून बाहेर पडायचं. तिथं जुनी दुकाने, कुठे मंदिरे, कुठे जीर्ण झालेली घरं दिसतात. त्या घरातली, दुकानातली माणसं न दिसता ही समजतात, अनुभवता येतात.”

कविता सांगते, “त्या घरातली, दुकानातली माणसं न दिसता ही समजतात, अनुभवता येतात.”

World Tourism Day : पर्यटन असावे पर्यावरण पूरक

प्रसिद्ध अशा ठिकाणी तुम्ही ठिकठिकाणी प्लॅस्टिक, पाण्याच्या रिकाम्या बॉटल, चॉकलेट वेफर्सच्या पिशव्या, अन्न असं बरच इतरत्र पडलेलं पाहायला मिळतं. नवनवीन ठिकाणी प्रवास करणाऱ्या कविताच्या मते, ” सार्वजनिक ठिकाणी आपण केलेला कचरा टाकणाऱ्या माणसांची मला कीव येते, आपल्याला फिरायला पाहिजे, मज्जा करायला पाहिजे, पण स्वतःचा कचरा स्वतः नेवून योग्य ठिकाणी टाकायला नको. काय होतं आपण खालेले बिस्कीटची पाकिटे, वेफर्सच्या पिशव्या, प्लास्टिक ग्लास स्वतः बॅगेत घेवून जायला. अशा वृत्तीमुळेच पर्यटन खराब होते. मुळात जी गोष्ट जशी आहे त्याला तशीच ठेवा, या विषयावर जितकं लिहावं तितकं कमी आहे. आणि नुसतच वाचणं आणि सोडून देणे त्याहून खराब. त्यापेक्षा कृती करणं कधीही चांगल्या पर्यटनास पुरक ठरेल.”

काही लोक आयुष्यभर आठवणीतही राहतात… 

“प्रवासाला गेले की आईच्या सूचना असतात काही वेळा ती सांगत असते, एकटी आली आहे हे तिथे कुणाला सांगू नकोस. जास्त कोणाशी बोलू नकोस. कुणी विचारलं तर म्हणायचं, आहेत मागे माणसं, येत आहेत”. पुढे बोलताना कविता सांगते काही ओळखी आयुष्यभर टीकतात, त्याबाबतीत ती नोएडाच्या सोलो ट्रीपमधील एक किस्सा सांगते,” नोएडाच्या प्रवासात अशीच एक ओळख झाली होती. तेव्हा  रात्री १-२ वाजताच्या सुमारास माझी ट्रेन होती. याचदरम्यान फिरता फिरता एका ड्रायव्हरशी ओळख झाली. मी एकटी होते तेव्हा तो रात्री १ पर्यंत थांबला होता. दिल्ली स्पेशल खोया पनीर आणि रोटी स्टेशन वर खात युपीमधील त्याच्या गावातील बरेच किस्से ऐकत मी ऐकले.”

कविता सांगते "प्रवास माणसाला समृद्ध करतो. आणि माझ्या या प्रवासाचा प्रवाह कायम राहील...." World Tourism Day : पहिला सोलो ट्रॅव्हल
“प्रवास माणसाला समृद्ध करतो. आणि माझ्या या प्रवासाचा प्रवाह कायम राहील….” ( सर्व छायाचित्रे : कविता जांभळे )

प्रवास आपल्‍या अनेक प्रश्‍नांची उत्तरे देताे…

फिरण्याबदद्ल कविता भरभरुन बोलते, ती म्हणते, ” फिरणं म्हणजे प्रमे करणं”. त्या ठिकाणांंच्या जितकं आपण जवळ जाऊ तितक त्याला जाणून घ्यायची इच्छा होत राहते. त्याच्या इतिहासाकडे वळतो. पुढे बोलताना ती म्हणते, ” प्रवासाने आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळतात. तिथे तुम्ही स्वतःला शोधा.

 

हेही वाचा 

Back to top button