पुणे, पुढारी वृत्तसेवा: पावसाळी पर्यटनाला तुम्ही निघणार असाल तर सावध रहा. ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणाचा भौगोलिक अभ्यास करुन तेथे संपर्क कुरुनच निघा. रस्यात कुठे दरड कोसळली असेल तर त्याचीही माहिती घ्या. नाहीतर तुमची मोठी अडचण होऊ शकते. हे अलर्ट आहेत महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत झालेल्या भयंकर घटनेनंतर महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, हवामान विभाग स्थानिक प्रशासनाने सावधानतेच्या सुचना देणारे अलर्ट वाढवले आहेत. राज्यात पाऊस सक्रिय झाल्याने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी राज्यातील विविध पर्यटनाच्या जागांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर हे अलर्ट वाढवले आहेत.
पालघर, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यातही माळशेज, लोणावळा, भाजे, कार्ले, महाबळेश्वर, पाचगणी, कोयना धरण या भागात पर्यटकांचा ओघ जास्त वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून या सर्व भागात 150 ते 200 मीमीच्या वर पाऊस होत असल्याने तेथे बाहेरच्या राज्यातूनही पर्यंटक येत आहेत.
घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी धबधबे, पाणथळ ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात होत आहे. पावसामुळे रस्ते, घाट, पायवाटा निसरड्या झालेल्या आहेत व सतत दरड कोसळण्याच्यी शक्यता हवामान विभागासह स्थानिक व जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे.आपण कोठे फिरायला जात असाल तर त्याची माहिती जवळच्या नातेवाईकांसह जेथे जात आहात तेथील प्रशासनाला द्या. म्हणजे संकटकाळी मदत करणे सोपे जाईल.
पावसाळी पर्यटनामध्ये घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पसंती असते. धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी सतर्क राहण्याबाबतच्या आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच सेल्फी पॉईंट काढून टाकण्यात आले आहेत, तिथे लोखंडी जाळ्या-कठडे बसविण्यात आले आहेत. पर्यटकांनी सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा.
– मौसमी कोसे, व्यवस्थापक, एमटीडीसी
हेही वाचा: