धार्मिक आणि पर्यटनस्थळी पोहोचा सुपरफास्ट | पुढारी

धार्मिक आणि पर्यटनस्थळी पोहोचा सुपरफास्ट

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा ऐन गणेशोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांना तब्बल नऊ ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची भेट दिली आहे. व्हर्च्युअल पद्धतीने त्यांनी या एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेही उपस्थित होते. अकरा
राज्यांना जोडणार्‍या या नव्या एक्स्प्रेसमुळे धार्मिक आणि पर्यटनस्थळी पोहोचणे सुपरफास्ट होणार आहे. या गाड्यांद्वारे चांगली कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.

तिरुपतीसह मदुराईचे मीनाक्षी मंदिर असो अथवा अहमदाबादची मंदिरे आणि पर्यटन स्थळे असोत, या सर्व ठिकाणी भाविक आणि पर्यटकांना अधिक वेगाने जाता येणार आहे. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ही सध्याच्या घडीला देशात असलेल्या फास्ट पॅसेंजर ट्रेनपैकी एक आहे.
या ट्रेनने प्रवास केल्यास दोन ते तीन तासांचा वेळ वाचणार आहे.

अकरा राज्यांना जोडणार

रविवारपासून सेवेत आलेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा फायदा अकरा राज्यांना होणार आहे. राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेशला त्याचा विशेष लाभ होईल. त्याशिवाय कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातलाही या एक्स्प्रेसचा फायदा होणार आहे.

आठ कोचच्या आटोपशीर ट्रेन

आधी ज्या वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले होते, त्या सर्व 16 डब्यांच्या होत्या. आता या नऊही एक्स्प्रेस आठ डब्यांच्या आहेत. यात एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि सात इकॉनॉमी चेअर कोच असणार आहेत. भविष्यात जसा प्रतिसाद मिळेल त्या प्रमाणे कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे. आयटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर हैदराबाद आणि बंगळुरूदरम्यान प्रवास करत असतात. सध्या या दोन शहरांदरम्यान तीन नियमित सेवा आहेत. आता ‘वंदे भारत’ ही चौथी नियमित सेवा सुरू होणार आहे. वंदे एक्स्प्रेस महबूबनगरहून निघेल. ती तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांतून जाणार आहे.

Back to top button