नाशिक : कांदाप्रश्नी पालकमंत्र्यांची मध्यस्थी निष्फळ | पुढारी

नाशिक : कांदाप्रश्नी पालकमंत्र्यांची मध्यस्थी निष्फळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कांदा व्यापाऱ्यांच्या लिलाव बंदप्रश्नी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी (दि. २१) पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलविलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताच ठोस निर्णय होऊ शकला नाही. व्यापाऱ्यांनी तूर्तास संपावर ठाम राहण्याची भूमिका घेतल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

संबधित बातमी :

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद केले आहे. विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे कांद्याचे लिलाव ठप्प पडले आहेत. या प्रश्नावर ताेडगा काढण्यासाठी ना. भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा व्यापारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा व पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारने नाफेड व एनसीसीएफद्वारे खरेदी केलेला कांदा देशांतर्गत घाऊक बाजारात कमी दरात विक्री केला जाताे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना त्याचा थेट फटका सहन करावा लागतो आहे. जास्त किमतीने खरेदी केलेल्या कांद्याला बाजारपेठ मिळत नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली. नाफेडच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातून वर्षभराच्या तुलनेत केवळ १० दिवस कांदा खरेदी करून शासन कांद्याचे दर पाडत आहे. खासगी बाजार समित्यांमध्ये ५० पैसे फी असताना बाजार समित्या एक रुपया फी आकारत आहेत. देशात सर्वच राज्यात आडत घेण्यात येत असताना राज्यात ती लागू नाही. त्यामुळे परराज्यात कांदा विक्री करताना त्रास सहन करावा लागतो आहे, अशा अनेक व्यथा व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा घाऊक बाजारात आणून दर पाडण्यापेक्षा रेशन दुकानातून फुकट वितरित करावा आदी मागण्या करण्यात आल्या.

पालकमंत्री भुसे यांनी २६ तारखेला पणनमंत्री अब्दुल सत्तार हे यासंदर्भात बैठक घेणार आहेत. तेथे तुमच्या समस्या मांडाव्यात. गणेशोत्सव व आगामी सणांचे महत्त्व लक्षात घेता तूर्तास संप मागे घ्यावा, अशी विनंती भुसे यांनी केली. मात्र, मागण्यांवर ताेडगा निघेपर्यंत लिलावात सहभागी न हाेण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी बोलविलेली बैठक निर्णयाविनाच आटोपती घ्यावी लागली.

येवल्यात आज बैठक

जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची शुक्रवारी (दि.२२) दुपारी तीनला येवल्यात पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (दि.२६) कांदा व्यापारी व शेतकरी संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलविली आहे. त्या बैठकीत कांद्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा  :

Back to top button