लवंगी मिरची : गावाकडचा उत्सव

लवंगी मिरची : गावाकडचा उत्सव
Published on
Updated on

मित्रा, तू बघितलंस का, सध्या पुणे आणि मुंबईमध्ये बर्‍यापैकी गर्दी कमी झाली आहे. रस्त्याने फिरताना आणि श्वास घेताना मोकळेपणा वाटत आहे. काल मी सहज दादरमध्ये फेरफटका मारायला गेलो तर नेहमीपेक्षा 50 टक्केच गर्दी होती. काय कारण असेल बरे? अरे साधे कारण आहे. मुंबईमध्ये काम करणारा चाकरमानी कोकणी माणूस गौरी-गणपतीच्या सणाला हमखास गावाकडे जातो म्हणजे जातोच. शिवाय पुण्यामध्ये वस्तीला असलेले अस्सल मराठवाडी लोक गणपतीसाठी नाहीतर गौरीसाठी मात्र आपल्या गावी जातच असतात. त्यामुळे साहजिकच या शहरांमध्ये गर्दी कमी होऊन मोकळे मोकळे वाटायला लागते. अगदी जर्मनी आणि जपानमध्ये काम करणारे मराठवाडी तरुणसुद्धा एक वेळ दिवाळीला आपल्या गावी जाणार नाहीत; परंतु गौरी-गणपतीसाठी मात्र नक्की गावी येतात. ते मला माहीत आहे रे, पण या विशिष्ट सणांना आपल्या गावी येण्याची इतकी ओढ मराठी माणसांना का वाटत असेल? तसे तर प्रत्येक शहरामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात, तरीही तो उत्सव आपल्या गावी जाऊन साजरा करण्याची तळमळ मराठी माणसाला का असेल? हे काही माझ्या लक्षात येत नाही.

अरे सोपे आहे. प्रत्येक माणसाचे वय वर्षे 8 ते 16 हे जे भावविश्व असते ते न विसरणारे असते. मग जे लोक शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत त्यांच्या घरी गौरी आणि गणपतीची मोठी परंपरा असते. त्या परंपरेला जागून पुन्हा त्या जुन्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी हे सगळे लोक आपल्या गावी धाव घेतात. साहजिकच कोकणातली माणसे कोकणात जातात, मराठवाड्यातली माणसे मराठवाड्यात जातात खानदेश, विदर्भातील लोक आपापल्या गावाकडे जातात आणि काही काळ त्या शहरांना महानगरांना मोकळा श्वास अनुभवता येतो. हो, हे मात्र खरे आहे; परंतु गावाकडे जाणार्‍या लोकांची गर्दीच गर्दी रस्त्यांवर दिसत आहे. लोक ट्रॅव्हल्समधून, रेल्वेने, स्वतःच्या गाड्यांमधून जसे जमेल तसे गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रभर रहदारी संथ वेगाने होताना दिसून येत आहे.

अरे बाबा, जाऊदे, संथ वेगाने जाऊ दे की, कसेही जाऊ दे, पण सर्वात महत्त्वाचे काय असेल तर सुरक्षित जाऊ दे. रस्त्यावर वाहने जास्त आली की अपघात ठरलेले असतात आणि अपघात आले की कुणाचा तरी जीव जाणार, कुणीतरी जखमी होणार हे निश्चित असते. त्यामुळेच मी तर दरवर्षी गणपती उत्सव जवळ आला की श्री गणेशाला लोकांच्या सुरक्षिततेची मागणी करत असतो. सुरक्षित प्रवास कराल तर नीट घरी पोहोचाल आणि यावर्षी नीट घरी पोहोचलात तर पुढच्या वर्षी पुन्हा आपल्या गावी उत्सव साजरे करायला जाल. हे जेवढे लवकर लोकांना समजेल तेवढे चांगले.

होय ना. रात्री बेरात्रीचे प्रवास, तेही कुटुंबासह करणे टाळले पाहिजे. कारण जास्तीत जास्त अपघात रात्रीच होतात. समृद्धी महामार्गाचे उदाहरण घे. तिथे असंख्य अपघात झाले. त्यापैकी 80 टक्के अपघात रात्रीच्या वेळी झाले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की रात्रीचा प्रवास करणे फारसे सुरक्षित नाही त्यामुळे जाताना आणि येतानाचा प्रवास गावी जाणार्‍या जनतेने शक्यतो दिवसा केला पाहिजे. भले त्यासाठी एक-दोन दिवस सुट्ट्या जास्त टाकाव्या लागतील तरी हरकत नाही; परंतु सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news