Ganesh Utsav : बाप्पाला प्रिय दुर्वा, आघाडा, जास्वंदीचे औषधी महत्त्व मोठे | पुढारी

Ganesh Utsav : बाप्पाला प्रिय दुर्वा, आघाडा, जास्वंदीचे औषधी महत्त्व मोठे

गौरव डोंगरे

कोल्हापूर : गणपती बाप्पाच्या सणावेळी दुर्वा, आघाडा, जास्वंद यासह 21 वेगवेगळ्या पत्री अर्पण केल्या जातात. भक्तांनी मोदक, खीरीसोबत आयुर्वेदात अनन्य साधारण महत्त्व असणार्‍या या औषधी वनस्पतींचा खाण्यात वापर करावा, यासाठी निसर्गमित्र संस्थेने पुढाकार घेतला आहे. तुळस, देवदार, निर्गुडी, पिंपळ, बोर, रूई, शंखपुष्पी, मरवा, महाका, जास्वंद, कनेर, कनेर, जाई, डाळिंब, डोरली, धोत्रा, शमी, बेल, पळस, अर्जुन, आपटा, हादगा या वनस्पतींचा समावेश आहे. (Ganesh Utsav)

दुर्वा : औषधी उपयोग : नाकातून रक्त येत असल्यास दुर्वा रस नाकात घालावा. जुन्या जखमा ज्यात दाह जास्त आहे अशांना दुर्वाघृत (तूपामध्ये दुर्वेचा रस घालून तयार केलेले औधी तूप) घालावे. पित्तामुळे उलटी होत असल्यास दुर्वारस तांदळाच्या धुवणाबरोबर साखर घालून द्यावा. लघवी साफ होत नसल्यास दुर्वांच्या मुळांचा काढा करून त्यात साखर व मध घालून घ्यावा. नागीण झाल्यानंतर कच्चे तांदूळ भिजत घालून दुर्वांबरोबर वाटून नागीण उठलेल्या जागेवर लावावा, दाह कमी होतो.

आघाडा : ही औषधी वनस्पती आहे तिची मुळे, पाने, फुले, फळे औषधात वापरतात. भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, अपचन इत्यादी रोग व विकारात उपयुक्त आहे. अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत. दातदुखी पानाचा रस हिरड्यावर चोळतात. आघाडीच्या कोवळ्या पानाची भाजी करतात ही भाजी पाचक म्हणून काम करते
ज्येष्ठा गौरी आवाहनावेळी तेरडा नावाच्या वनस्पतीची प्रतीकात्मक पूजा केली जाते. त्वचाविकार, भाजल्यावर थंडावा देण्यासाठी याचा रस लावतात. हाड मोडणे, संधिवात, खाज घालवण्यासाठी तसेच वातावर देखील हा गुणकारी आहे. (Ganesh Utsav)

तेरड्याच्या विविध पाककृती : बियांची भाजी किंवा पानांचा आणि फुलांचा वापर करून सॅलेड किंवा फुलाची मिठाई असे पदार्थ बनवले जातात. वाळलेल्या बियांचा वापर चहा बनविण्यासाठी करतात. तसेच या बियांपासून तेल काढतात. पानांची कोरडी भाजी व देठाची रस्सा भाजी केली जाते. शंकरोबा म्हणून शंखपुष्पी किंवा द्रोणपुष्पी नावाच्या वनस्पतीचे प्रतीकात्मक पूजन केले जाते. ही वनस्पती खोकला व ताप विकारात गुणकारी आहे. मलेरिया व दमा यासारख्या आजारांवर देखील याच्या पानाचा रस वापरला जातो. तसेच त्वचा विकारावर ही फायदेशीर असल्याची देखील आयुर्वेदामध्ये नोंद आहे. ग्रामीण भागात सर्दी खोकला झाल्यास या वनस्पतींच्या फुलांचे व मधाचे मिश्रण एकत्रित करून देत.

मातीकडून घेतलेले मातीला परत करूया : अनिल चौगुले…

बाजारातून पैसे देऊन विकत आणलेल्या या वनस्पतींचे व्यवस्थापन देखील शास्त्रीय पद्धतीने करणे गरजेचे आहे. या वनस्पतींच्या पूजनादरम्यान त्यांचा एकत्रित गुच्छ करून, चाफ्याच्या पानांमध्ये गुंडाळून दोर्‍याने बांधले जाते, त्यावर कापसाचे पोवते, फुले, हळद-कुंकू वाहिले जाते. विसर्जनानंतर मिळालेल्या निर्माल्यातील या वनस्पती वाळवून त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करावे. यानिमित्ताने मातीकडून घेतलेले घटक मातीलाच परत करावेत, असे आवाहन निसर्गमित्र परिवाराचे अनिल चौगुले यांनी केले आहे. (Ganesh Utsav)

हेही वाचा : 

Back to top button