एसटी संप : स्‍वारगेट, शिवाजीनगर, वाकडेवाडीसह पुणे विभागातील १३ डेपो बंद | पुढारी

एसटी संप : स्‍वारगेट, शिवाजीनगर, वाकडेवाडीसह पुणे विभागातील १३ डेपो बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलीनीकरण करा, या मागणीसाठी स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथील एसटीच्या स्थानकांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारून जोरदार निदर्शने केली. प्रवाशांना एसटी स्‍थानकात पोहोचल्‍यावर एसटी संप असल्‍याचे समजत असल्‍याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी पुणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी काल (रविवार) मध्यरात्रीपासून पुणे विभाग बंदची घोषणा केली होती. त्यानुसार रात्री 12 नंतर पुणे विभागातील तेरा डेपो बंद झाले. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संपाबाबत माहिती नसल्याने अनेक प्रवासी स्वारगेट स्थानकात येऊन परतत आहेत. स्वारगेट स्थानकात बाहेरून येणाऱ्या आणि स्वारगेट स्थानकातून बाहेर जाणाऱ्या सर्वच्या सर्व गाड्या बंद करण्यात आल्‍या आहेत.

स्वारगेट डेपोतील गाड्या एका जागेवर उभ्‍या करण्यात आल्‍या आहेत. तसेच आंदोलनामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी येथे तैनात करण्यात आली आहे. स्वारगेट स्थानकातील आणि डेपोतील एसटीचे कर्मचारी स्वारगेट स्थानकात जमून जोरदार निदर्शने केली जात आहेत.

तसेच येथे येणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधला असता, प्रवाशांनी या संपाबाबत आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले. आता आम्ही प्रवास कसा करायचा असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. स्वारगेट स्थानकात प्रवाशांचे येणे सुरूच असून येथे प्रवाशांची गर्दी होत आहे.

  • स्वारगेट स्थानकाबाहेर ट्रॅव्हल्सची गर्दी…

एसटीच्या गाड्यांचा संप असल्यामुळे स्वारगेट परिसरात खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांची गर्दी झाली आहे. प्रवाशांना नाईलाजास्तव एसटी मिळत नसल्यामुळे ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. परिणामी, खासगी वाहतूकदार प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणी करून लूट होत असल्‍याचे दिसून येत आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनसह पुणे विभागातील 13 डेपो रात्री बारा वाजल्‍यापासून बंद…

– स्वारगेट परिसरात कडक पोलिस बंदोबस्त
– कर्मचाऱ्यांची स्वारगेट परिसरात निदर्शने
– स्वारगेट डेपो बाहेरच्या डेपोच्या गाड्या हे येणे जाणे बंद
– संपाबाबत माहीत नसल्यामुळे अनेक प्रवासी स्वारगेट स्थानकातील येऊन परत जात आहेत.
– स्वारगेट डेपोच्या सर्व गाड्या जागेवरच उभ्या

Back to top button