Stock market : आरोग्य सुधारले, क्रयशक्ती वाढली! | पुढारी

Stock market : आरोग्य सुधारले, क्रयशक्ती वाढली!

डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या आठवड्यात निर्देशांकाला थोडी खीळ बसली होती. पण सोमवारी 1 तारखेला शेअरबाजाराचे (Stock market) उत्तररामायण सुरू झाले आणि निर्देशांक 800 अंकांनी वर गेला. परदेशी गुंतवणूकदारांनीही थोडीफार विक्री करून नफा गाठी बांधला. आता पुढची व्याघ्रउडी घेण्यासाठी शेअरबाजाराने (Stock market) दबा धरला आहे. यापुढची त्याची झेप मोठी असेल. सोमवारी बाजार बंद होताना निर्देशांक 60,138 च्या अंकांवर स्थिरावला तर निफ्टी 258 अंकांनी वाढून 17929 च्या पातळीवर बंद झाला.

बँकिंगच्या समभागांच्या उलाढालीत जास्त उत्साह दिसला. मुख्यत्वे आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक हे बिनीचे सैनिक होते. वस्तू सेवा कराने 1.30 लाख कोटी रुपयांचे लक्ष्य गाठले. वस्तू सेवा करात गेले 4 महिने म्हणजेच जून 2021 पासून सतत वाढ आहे. सणासुदीच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे वस्तू सेवा कराचे उत्पन्न मिळायला त्याचा मोठा हातभार लागला. आता दरमहा 1 कोटी रुपयांपेक्षा कितीतरी जास्त या कराचे संकलन होत आहे. ऑक्टोबर 2020 या महिन्याची तुलना करता यंदाच्या ऑक्टोबरमध्ये घसघशीत म्हणजे 24 टक्के वाढ दिसते. वस्तू सेवा करात जास्त वाढ होत आहे.

याचाच अर्थ, लोकांची क्रयशक्ती वाढली आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे लोकांचे आरोग्यमान सुधारले आहे. लॉकडाऊनमध्ये बरीच सवलत दिली गेली असल्यामुळे चित्रपटगृहे, नाट्यगृहे खुली झाली आहेत. तसेच शाळा आणि महाविद्यालयेही पूर्णपणे सुरू झाली आहेत. सेमी कंडक्टरमुळे वाहन उद्योग व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाला नसता तर वस्तू सेवा करात आणखी वाढ झाली असती.
ज्या कंपन्यांवर लक्ष्य केंद्रित करावे, त्यात पुढील 5 कंपन्यांचा समावेश करता येईल.

1) ऑईल इंडिया, 2) कोल इंडिया, 3) CESC (कोलकाता इलेक्ट्रीक सप्लाय), 4) NTPC, 5) वेदांत पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू या इंधनांच्या किमतीत पुढील काही महिने वाढ होईल. त्यामुळे या क्षेत्रातल्या कंपन्यांना चांगले दिवस आहेत.

याउलट खाद्यतेलांच्या किमती प्रती किलो तीन ते पाच रुपयांनी कमी होणार आहेत. याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. कारण खाद्यतेले ही सर्वांच्या गरजेची वस्तू आहे. याचे मुख्य कारण केंद्र सारकारने खाद्यतेलांच्या आयात शुल्कात कपात केली आहे. देशातील खाद्यतेलांची गरज भागवण्यासाठी एकूण मागणीच्या 60 टक्के तेलाची आयात करावी लागते. मुख्यतः त्यात पामतेल मलेशियाहून आयात केले जाते. ऑक्टोबर महिन्यात पामतेल, रिफाईंड सोयातेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेल आदी तेलांच्या घाऊक किमतीत 7 ते 11 टक्के घट दिसली आहे. ही तेले प्रामुख्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस्मधून वापरली जातात. दसरा, दिवाळीच्या आधीच या किमतीत घट झाल्यामुळे सर्वसामान्य जनता सुखावली आहे. (Stock market)

ऑक्टोबरमध्ये रस्त्यांवरील टोलवसुलीत मोठी वाढ दिसली. गेल्या महिन्यात सणासुदीच्या निमित्ताने मालवाहतुकीसाठी रस्त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला गेला. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे आंतरराज्यीय वाहतूक खूप वाढली. त्यामुळे टोल वसुलीचे उत्पन्न जास्त वाढले आणि राज्य सरकारांना त्याचा फायदा झाला. केंद्र सरकारने यंदा 15 फेब्रुवारीपासून फास्टॅगचा वापर गेले 9 महिने अनिवार्य केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’च्याच माध्यमातून टोलवसुली होत आहे. ‘फास्टॅग’ नसल्यास संबंधित वाहनचालकाकडून दुप्पट टोल वसूल केला जातो.

भारतात आता डिजिटल पद्धतीने व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. डिजिटल व्यवहार वाढते व्हावेत यासाठी दूरदर्शनवर आर.बी.आय. कहती है, ‘ये व्यवहार बढ़ानेसे लोगोंका फायदा ही होगा.’ अमेरिका आणि युरोपातील पुढारलेले देश, पूर्वेकडील जपान, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया इथे असे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. भारत ही त्यांच्या रांगेत जाऊ इच्छितो.

Back to top button